PPF खात्यातील रकमेवर केवळ १ टक्का व्याजाने घेऊ शकता कर्ज; पाहा नियम आणि अटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:58 AM2021-05-06T10:58:35+5:302021-05-06T11:11:44+5:30

PPF Loan : पाहा कर्जासाठी कोणते आहेत नियम आणि कसं घेऊ शकता कर्ज

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभरातील बर्‍याच लोकांना सध्या पैशांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

जर तुम्हााही पैशांची समस्या जाणवत असेल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही आता पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) खात्यातून फक्त १% व्याजावर कर्ज घेऊ शकता.

तसंच पैशांच्या मदतीनं तुम्ही तुमची कामंही करू शकता. पीपीएफ खात्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारे कर्ज घेऊ शकता.

या कर्जावर जे व्याज द्यावे लागेल ते वैयक्तिक कर्ज, सोन्याचे कर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जापेक्षा खूपच कमी आहे.

आर्थिक नियोजक जितेंद्र सोलंकी म्हणाले की पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्यासाठी अटी व शर्ती पाळाव्या लागतात.

पहिला नियम असा आहे की पीपीएफ खाते कमीतकमी तीन वर्ष जुनं असावं. दुसरा नियम असा आहे की कर्ज फक्त तीन वर्ष ते सहा वर्षांच्या दरम्यानच मिळेल.

तिसरा नियम असा आहे की तुम्हाला खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळेल.

तिसर्‍या वर्षी कर्ज घेतल्यास दोन वर्षानंतर जमा झालेल्या रकमेच्या आधारे त्याची गणना केली जाईल.

आपण एप्रिलपासून कोणत्याही महिन्यासाठी कर्जासाठी अर्ज केल्यास ३१ मार्चपर्यंत जमा केलेल्या रकमेवर गणना केली जाईल.

कर आणि गुंतवणूक सल्लागार मणिकरण सिंघल म्हणाले की पीपीएफ खात्यावर कर्ज तीन वर्षांसाठी म्हणजेच ३६ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या कालावधीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागेल.

पीपीएफ व्याज मोजताना कर्जाच्या रक्कमेची कपात केली जाते. जर आपण ३६ महिन्यांत कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसाल तर आपल्याला ६ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

कर्ज घेतलाना तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधता येऊ शकतो.

कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची किंवा काहीही तारण ठेवण्याची आवश्यतकता नसते.

कर्ज घेतला पीपीएफ व्याजावर टॅक्सची सूट मिळत नाही. ती बंद होते.

व्याजासह कर्जाची रक्कम परत करणं आवश्यक असतं. अन्यथा तुम्हाला कोणताही टॅक्सचा लाभ मिळत नाही.

पीपीएफ खातं उघडल्यानंतर तिसऱ्या आणि सहाव्या वर्षाच्या दरम्यानच तुम्ही कर्ज घेऊ शकता.

वर्षात केवळ एकदाच कर्ज घेण्याची मुभा असते. तसंच पहिल्यांदा घेतलेलं कर्ज परत केल्यानंतरच तुम्हाला पुढील कर्ज दिलं जातं.

पीपीएफद्वारे कर्ज घेताना तुमच्या क्रेडिट स्कोअरची गरज भासत नाही.