व्हाईट गोल्ड की रोज गोल्ड? तुमच्या खिशाला आणि फॅशनला काय परवडेल? कोणतं आहे ट्रेंडींग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:04 IST2026-02-15T14:31:51+5:302026-02-15T15:04:12+5:30
Different Types of Gold : सोनं आणि चांदीच्या दरातील गगनभरारीमुळे सध्या सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, बदलत्या फॅशननुसार आता केवळ 'पिवळं सोनं' नाही, तर 'व्हाईट गोल्ड' आणि 'रोज गोल्ड'चा ट्रेंडही जोरात आहे.

२०२५ मध्ये सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला, मात्र सर्वसामान्यांसाठी ते महाग झाले. २०२६ च्या सुरुवातीला किमतीत मोठी अस्थिरता दिसून आली असून चांदीचे भाव तर उच्चांकी पातळीवरून निम्म्यावर आले आहेत.

पिवळे सोने : हे सोन्याचे सर्वात शुद्ध आणि पारंपारिक रूप आहे. पूर्वीपासून भारतीय कुटुंबांमध्ये याच सोन्याचे दागिने खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे.

कॅरेटचे गणित : पिवळे सोने २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा स्वरूपात मिळते. दागिन्यांच्या मजबुतीसाठी त्यात कॅरेटनुसार तांबे किंवा चांदी मिसळली जाते.

पिवळ्या सोन्याचे बार, बिस्किटे आणि पारंपारिक जड दागिने हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय मानले जातात.

व्हाईट गोल्ड : हल्ली तरुण पिढीमध्ये 'व्हाईट गोल्ड'ची मोठी क्रेझ आहे. हे दिसायला चांदीसारखे असले तरी ते मौल्यवान असते.

व्हाईट गोल्डची बनावट : पांढरे सोने तयार करण्यासाठी शुद्ध सोन्यामध्ये चांदी, निकेल किंवा पॅलेडियम यांसारखे पांढरे धातू मिसळले जातात. या दागिन्यांची चकाकी टिकवण्यासाठी त्यावर 'रोडियम'चे कोटिंग केले जाते.

पांढरे सोने प्रामुख्याने १४ आणि १८ कॅरेटमध्ये उपलब्ध असते. साखरपुड्याच्या अंगठ्या किंवा आधुनिक डिझाईन्ससाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

रोज गोल्ड किंवा पिंक गोल्ड : सध्या महिलांमध्ये 'रोज गोल्ड' किंवा 'पिंक गोल्ड'चे दागिने सर्वाधिक लोकप्रिय आहेत. याला विंटेज आणि स्टायलिश लूक मिळत असल्याने याची मागणी वाढली आहे.

रोज गोल्डला गुलाबी छटा देण्यासाठी सोन्यामध्ये तांब्याचे प्रमाण अधिक राखले जाते. यामुळे दागिन्यांना एक वेगळाच 'पिंकिश' लूक मिळतो जो दिसायला अत्यंत नाजूक आणि आकर्षक असतो.

सोन्याच्या वाढत्या किमती आणि बदलत्या फॅशनमुळे आता लोक केवळ पिवळ्या सोन्यावर अवलंबून न राहता, आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा रोज गोल्डसारख्या कमी कॅरेटच्या पण ट्रेंडी पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.

















