अच्छे दिन आले? भारतातील दारिद्र्याचे प्रमाण १२ टक्के घटले; मोदी सरकारने करुन दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:50 PM2022-04-19T16:50:04+5:302022-04-19T16:55:37+5:30

केंद्रातील मोदी सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रभावी योजना राबवल्याने हा परिणाम दिसून आल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईचे प्रमाण खूपच वाढल्याचे दिसत आहे. इंधनदरवाढीसोबत गॅसचे भाव वाढल्याने अन्य गोष्टींवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

कोरोनाच्या तडाख्यातून देश बहुतांश प्रमाणात सावरत असताना महागाईमुळे देशातील नागरिक त्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक गोष्टी महागल्याने आर्थिक नियोजन करणे सामान्य माणसांना जड जात आहे.

यातच आता वाढत्या गरिबीबाबत नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित राष्ट्रांकडून लक्ष्य होणाऱ्या भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २०११ ते २०१९ या आठ वर्षांत १२.३ टक्क्यांनी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातून समोर आले आहे.

२०११ मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २२.५ टक्के होते ते २०१९ मध्ये १०.२ टक्के इतके खाली आले आहे. या आठ वर्षांत ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.

कोरोना संकट काळात गरिब आणि श्रीमंतांमधील आर्थिक विषमतेची दरी वाढत असल्याचे दिसून आले होते. मात्र त्या पूर्वीच्या आठ वर्षात भारतातील गरिबी कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रभावी अंमलबजावणी योजना राबवल्याने हा परिणाम दिसून आल्याचे म्हटले जात आहे.

वर्ल्ड बँकेच्या संशोधन अहवालानुसार २०११ ते २०१९ या आठ वर्षात ग्रामीण भारतातील लोकांचे राहणीमान उंचावले आहे. या भागातील गरिबी झपाट्याने कमी झाली.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालात देखील भारतातील दारिद्र्य जवळपास संपुष्टात आल्याचा दावा करण्यात आला होता.

ग्रामीण भारतात २०११ मध्ये गरिबीचे प्रमाण २६.३ टक्के इतके होते. ते २०१९ मध्ये १४.७ टक्के इतके खाली आले आहे. यात ११.६ टक्के घसरण झाली. याशिवाय शहरी भागातील गरिबीचे प्रमाण ७.९ टक्क्यानी कमी झाले आहे. वर्ल्ड बँकेच्या या अहवालानुसार शहरी भागात दारिद्र्याचे प्रमाण २०१९ मध्ये ६.३ टक्के इतके खाली आले.

मागील १० वर्षात भारतीयांचे जीवनमान उंचावल्याने गरिबी कमी झाली असली तरी अपेक्षेप्रमाणे त्यात म्हणावी तितकी घट झालेली नाही, असे महत्वाचे निरिक्षण वर्ल्ड बँकेच्या या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

वर्ल्ड बँकेचा हा संशोधन अहवाल अर्थतज्ज्ञ सुतीर्थ सिन्हा रॉय आणि व्हॅनडर वेइड यांनी तयार केला आहे. आठ वर्षात गरिबी कमी होण्याबरोबरच अल्प भूधारक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सन २०१३ ते २०१९ या या काळात केलेल्या सर्व्हेक्षणानुसार लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तब्बल १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मोठ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २ टक्के वाढ झाली आहे.

भारतातील गरिबीबाबतचा एक संशोधन अहवाल नुकताच वर्ल्ड बँकेने जाहीर केला. त्यातील भारतासाठी दारिद्र्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी महत्वाची मानली जाते.