सिक्योरिटी गार्डची केली नोकरी, बर्गरही विकले; आज आहेत १२४९५ कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:29 AM2024-01-05T08:29:00+5:302024-01-05T08:38:04+5:30

एकेकाळी निकेश अरोरा ठरले होते गुगलचे सर्वात महागडे कर्मचारी.

भारतीय वंशाचे टेक सीईओ निकेश अरोरा (Nikesh Arora) हे २०२४ सालचे पहिले अब्जाधीश बनले आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. निकेश अरोरा यांच्या नावावर एक नवीन कामगिरी जमा झाली आहे. निकेश अरोरा यांच्या नावे यापूर्वीही अनेक विक्रम आहेत.

ते गुगलचे सर्वात महागडे कर्मचारीदेखील ठरले होते. निकेश अरोरा यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. सध्या ते पाओ अल्टो नेटवर्क्स या सायबर सुरक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, निकेश अरोरा यांना पाओ अल्टो नेटवर्क्सचे सीईओ म्हणून चांगला पगार मिळत आहे.

याशिवाय, त्यांना इतर अन्य लाभदेखील मिळत आहे, ज्यामुळे निकेश अरोरा यांची सध्याची एकूण संपत्ती १.५ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे १२४९५ कोटी रुपये झाली आहे. आज जरी ते १२,४९५ कोटींचे मालक असले तरी एक काळ असा होता जेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता.

निकेश अमेरिकेत शिकत असताना त्यांच्या वडिलांनी त्याला ७५ हजार रुपये दिले होते. हे पैसे खूपच कमी होते. अशा परिस्थितीत निकेश आपला खर्च भागवण्यासाठी वेगवेगळी नोकरी करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका बर्गरच्या दुकानात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीपासून सेल्समनपर्यंत सर्व काम केलं.

निकेश यांच्या नावाची २०१२ मध्ये तेव्हा चर्चा झाली जेव्हा ते गुगलचे सर्वात महागडा कर्मचारी बनले. त्यावेळी गुगलने त्यांना ५१ मिलियन डॉलर्सचं पॅकेज दिले होतं. हे इतर कोणत्याही एक्झिक्युटिव्हपेक्षा अतिशय जास्त होतं. गुगलशिवाय त्यांनी सॉफ्टबँकमध्येही रेकॉर्ड केला. २०१४ मध्ये, सॉफ्टबँकनं त्यांना १३५ मिलियन डॉलर्सचं पॅकेज दिलं. निकेश त्यांच्या सॅलरी पॅकेजमुळे अनेकदा चर्चेत असतात.

निकेश अरोरा यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. ते मूळ गाझियाबाद, उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. निकेश यांचे वडील हवाई दलात अधिकारी पदावर होते. निकेश यांनी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीतील एअर फोर्स स्कूलमधून केलं. १९८९ मध्ये त्यांनी काशी हिंदू विद्यापीठ बीएचयू आयआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech चं शिक्षण घेतलं.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी विप्रोमध्ये नोकरी करून करिअरला सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर ते नोकरी सोडून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन, अमेरिका येथून एमबीए केले. त्यानंतर १९९२ मध्ये ते फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट कंपनीत रुजू झाले.