वारसा नव्हे, कर्तृत्वाने गाजवतायत जग! 'या' ६ महिलांनी बदलला भारतीय व्यवसायाचा नकाशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:32 IST2026-03-08T10:29:57+5:302026-03-08T10:32:35+5:30
Women's Day 2026 : भारतातील अब्जाधीशांच्या कन्या आता केवळ वारशाने मिळालेल्या संपत्तीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञान असो वा रिटेल क्षेत्र, या महिलांनी आपल्या दूरदृष्टीने कौटुंबिक साम्राज्याचा विस्तार तर केलाच, पण उद्योगांची दिशाही बदलली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देणाऱ्या अशाच ६ प्रभावशाली महिलांचा घेतलेला हा आढावा.

रोशनी नाडर : एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील कोणत्याही सूचीबद्ध आयटी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलेल्या रोशनी यांची नेटवर्थ सुमारे ३.५ लाख कोटी रुपये आहे. त्या 'शिव नाडर फाउंडेशन'च्या माध्यमातून परोपकारी कार्यही करतात.

ईशा अंबानी : मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या विस्तारात आणि भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिलायन्स रिटेलच्या संचालिका म्हणून त्या ई-कॉमर्स आणि प्रीमियम रिटेल क्षेत्राचे यशस्वी नेतृत्व करत आहेत.

निसाबा गोदरेज : १२५ वर्षांहून अधिक जुन्या गोदरेज समूहाच्या आधुनिकीकरणाचे श्रेय निसाबा गोदरेज यांना जाते. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे.

जयंती चौहान : रमेश चौहान यांची कन्या जयंती चौहान यांनी 'बिसलेरी' या भारतातील सर्वात मोठ्या बाटलीबंद पाणी ब्रँडच्या विस्तारात मोलाचा वाटा उचलला आहे. बाजारातील वाढत्या स्पर्धेतही बिसलेरीचे वर्चस्व टिकवून ठेवण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

वनीषा मित्तल : स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांची कन्या वनीषा मित्तल यांनी 'आर्सेलर मित्तल' या जगातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपनीच्या धोरणात्मक विस्तारात आपली योग्यता सिद्ध केली आहे. जागतिक बाजारपेठेत कंपनीचे स्थान बळकट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

अश्नी बियानी : रिटेल किंग किशोर बियानी यांची कन्या अश्नी बियानी यांनी 'फ्यूचर कन्झ्युमर लिमिटेड'ची स्थापना केली. भारतातील रिटेल क्षेत्राला नवा आकार देण्यात आणि ग्राहकांच्या गरजा ओळखून नवीन उत्पादने बाजारात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

















