सिलेंडरमध्ये १४.२ किलो गॅस असण्यामागे 'हे' आहे मोठे सुरक्षा कारण; ९९ टक्के लोकांना माहिती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:34 IST2026-03-17T15:29:01+5:302026-03-17T15:34:04+5:30
LPG Cylinders weight : भारतात घरगुती गॅसची सुरुवात १९५० च्या दशकात 'बर्मा शेल' (आताची भारत पेट्रोलियम - BPCL) या कंपनीने केली. त्यांनी त्यावेळी ठरवलेले सिलेंडरचे हे प्रमाण आजही एक 'मानक' म्हणून वापरले जाते.

रिकाम्या लोखंडी टाकीचे वजन आणि त्यातील १४.२ किलो गॅस मिळून सिलेंडरचे एकूण वजन २९.५ ते ३० किलोच्या दरम्यान होते. सरासरी भारतीय व्यक्तीला इतके वजन सहजपणे उचलणे किंवा हलवणे शक्य व्हावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.

एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाला महिनाभर स्वयंपाकासाठी किती गॅस लागेल, याचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळले की १४ किलो गॅस ३० ते ४५ दिवस आरामात पुरतो.

ग्राहकांना दर १५ दिवसांनी गॅस बुक करावा लागू नये आणि गॅस कंपन्यांनाही वितरण व्यवस्था सांभाळणे सोपे जावे, यासाठी महिन्याभराचा कोटा म्हणून ही मात्रा निश्चित केली गेली.

एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये प्रचंड दाबाने भरला जातो. हा दाब सहन करण्यासाठी सिलेंडरच्या लोखंडी भिंतींची जाडी एका ठराविक मर्यादेत ठेवावी लागते. १४.२ किलो ही मात्रा तांत्रिकदृष्ट्या सर्वात सुरक्षित मानली गेली.

जर १४.२ किलोपेक्षा जास्त गॅस भरला असता, तर सिलेंडर फुटण्याचा धोका वाढला असता किंवा सिलेंडरची टाकी अधिक जाड आणि जड बनवावी लागली असती, ज्यामुळे त्याची ने-आण करणे कठीण झाले असते.

एलपीजी हा 'प्रोपेन' आणि 'ब्युटेन' या दोन वायूंचे मिश्रण आहे. या वायूंची घनता आणि हवेच्या तापमानानुसार त्यांचा बदलणारा दाब लक्षात घेऊन १४.२ हा आकडा सर्वात अचूक ठरला.

सिलेंडर अधिक मोठा किंवा मजबूत बनवला असता तर त्याचे उत्पादन मूल्य वाढले असते. परिणामी, तो सामान्य माणसाच्या खिशाला परवडला नसता.

त्यावेळी वापरण्यात येणारी मापे आणि ब्रिटनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ३१.३ पाउंड्स या वजनाचे रूपांतर भारतीय मेट्रिक पद्धतीत केल्यावर ते अंदाजे १४.२ किलो इतके भरते.

ही मात्रा सुरक्षितता, वजन आणि वापर या तिन्ही गोष्टींचा एक 'गोल्डन बॅलन्स' आहे, ज्यामुळे गेल्या ७ दशकांपासून यात कोणताही मोठा बदल करण्याची गरज भासली नाही.

















