कोण आहेत अभिषेक अग्रवाल ज्यांची कंपनी रोज देणार ₹१०००००० चं भाडं? ३३ व्या वर्षी गाठलं शिखर, नेटवर्थ किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 08:55 IST2025-02-26T08:43:12+5:302025-02-26T08:55:20+5:30

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथील इस्माईल बिल्डिंग सध्या चर्चेत आहे. सुमारे ११८ वर्षे जुन्या या ऐतिहासिक इमारतीतील एक स्टोअर अॅपलपेक्षाही अधिक भाडं देणार आहे.पाहा कोणतं आहे हे स्टोअर

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथील इस्माईल बिल्डिंग सध्या चर्चेत आहे. सुमारे ११८ वर्षे जुन्या या ऐतिहासिक इमारतीत फॅशन ब्रँड झाराचं (Zara) स्टोअर होतं, जे आता बंद करण्यात आलं आहे. आता लक्झरी फॅशन ब्रँड पर्पल स्टाइल लॅब्स येथे एन्ट्री घेणार आहे. अभिषेक अग्रवाल हे या ब्रँडचे संस्थापक आहेत.

ब्रँडने या इमारतीत ६० हजार चौरस फूट जागा भाड्यानं घेतलीये. नोंदणी कागदपत्रांनुसार हा करार पाच वर्षांसाठी आहे. त्यासाठी दरवर्षी ३६ कोटी रुपये मोजावे लागणारेत. त्यानुसार ब्रँडला दररोज १० लाख रुपये म्हणजेच दरमहा ३ कोटी रुपये भाडे द्यावं लागणारे. त्यानुसार अभिषेक यांची कंपनी दररोजचं १० लाख रुपये भाडे देणार आहे.

मुंबई जिओ वर्ल्ड मॉलमध्ये अॅपलचं स्टोअर आहे. हा मॉल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आहे. अॅपलनं २०२३ मध्ये येथील स्टोअर ११ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतलंय आहे. त्याचं भाडं महिन्याला ४२ लाख रुपये आहे. तर अभिषेक अग्रवाल यांची कंपनी पर्पल स्टाइल लॅब्स (PSL) इस्माईल बिल्डिंगमध्ये महिन्याला जवळपास ३ कोटी रुपये भाडं देणार आहे. म्हणजेच त्यांचे भाडे अॅपलपेक्षा खूप जास्त असेल.

अभिषेक यांचा जन्म ओडिशात झाला. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी २००७-२०१२ दरम्यान आयआयटी, मुंबईमधून एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये बीटेक आणि एमटेक पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी डॉयचे बँकेत इक्विटी डेरिव्हेटिव्ह स्ट्रक्चरर म्हणून काम केलं. मे २०१५ पर्यंत ३ वर्षे ते या बँकेत राहिले. अभिषेक यांना 'माँटी' अग्रवाल या नावानंही ओळखलं जातं.

डॉयचे बँकेतील नोकरी सोडल्यानंतर अभिषेक यांनी फॅशनच्या दुनियेत पाऊल ठेवलं. २०१५ मध्ये त्यांनी पर्पल स्टाइल लॅब सुरू केली. पर्पल स्टाइल लॅब्स ब्रँड लक्झरी फॅशनमध्ये व्यवहार करतो. कंपनी 'पर्नियास पॉप-अप शॉप' या ब्रँडअंतर्गत अनेक बड्या डिझायनर ब्रँडची विक्री करते. २०१८ मध्ये पर्पल स्टाइल लॅब्सनं 'पर्नियाज पॉप-अप शॉप' विकत घेतलं. हे नवीन डिझायनर्सना पुढे जाण्यास मदत करते. त्यांना व्यवसायात यशस्वी करण्यासाठी विक्री, मार्केटिंग आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करते.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, पर्पल स्टाइल लॅब्स तरुण ताहिलियानी, फाल्गुनी शेन पीकॉक, अमित अग्रवाल, गौरव गुप्ता, सीमा गुजराल, अभिनव मिश्रा, श्यामल आणि भूमिका सारख्या प्रसिद्ध डिझायनर्सचे कपड्यांची विक्री करते.

२०२० मध्ये गोव्याचे प्रसिद्ध डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी अचानक निधन झालं. त्यानंतर पर्पल स्टाइल लॅब्सनं त्याचाही ब्रँड त्यात जोडला. मुंबईत केम्प्स कॉर्नर, जुहू आणि वांद्रे अशा पॉश भागात पर्पल स्टाइल लॅब्सची स्टोअर्स आहेत. देशातील इतर अनेक शहरांमध्ये त्यांची स्टोअर्स आहेत.

अभिषेक हे त्यांच्या लक्झरी लाईफसाठीही ओळखले जातात. २०२३ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी मर्सिडीज मेबॅक एस ६८० कार ४ कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यावेळी अभिषेक हे या लक्झरी कारचे मालक असलेले सर्वात तरुण भारतीय होते. अभिषेक २०२६ पर्यंत आपल्या कंपनीचा आयपीओ आणण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक अग्रवाल यांची नेटवर्थ १०६० कोटी रुपये आहे.