कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 22:33 IST2025-05-19T22:20:52+5:302025-05-19T22:33:18+5:30

Capital Gain Tax in Marathi: पैसा वाढवायचा असेल, तर तो गुंतवावाच लागतो. गुंतवणुकीशिवाय नफा मिळवणं अशक्य. त्यामुळे हल्ली प्रत्येक जण कुठे न कुठे भांडवली गुंतवणूक करतात. पण, यावरही सरकारला वेगळा कर द्यावा लागतो. त्याचं गणित कसं आहे, तेच समजून घ्या...

कॅपिटल म्हणजे भांडवल, गेन म्हणजे नफा आणि टॅक्स म्हणजे कर. तुम्ही केलेल्या भांडवली गुंतवणुकीतून जो प्रत्यक्ष नफा प्राप्त होतो यालाच कॅपिटल गेन म्हणजे 'भांडवली नफा' असे म्हणतात. हा नफा शेअर्स, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता म्हणजेच जमीन, घर इत्यादी याचबरोबर मेटल आणि कमोडिटी यावर लागू आहे.

वित्त मंत्रालयाने या कराचा दर निश्चित केला आहे. आपण या लेखात शेअर्स आणि म्युच्युअल फंड यासाठी भांडवली नफा नेमका किती? हे पाहू.

शॉर्ट टर्म गेन टॅक्स : एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत मिळालेला फायदा हा शॉर्ट टर्म या विभागात मोडतो. उदा. प्रतीकने १ जानेवारी २५ रोजी एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. मे २०२५ या महिन्यात त्याचा भाव दीड लाख रुपये इतका झाला. तेव्हा त्याने हे शेअर्स विकले.

प्रतीकला यात पन्नास हजार रुपयांचा फायदा झाला. हा नफा शॉर्ट टर्ममध्ये झाला. त्यामुळे यावर प्रतीकला टॅक्स भरावा लागेल. हा फायदा ज्या आर्थिक वर्षात होतो त्यानुसार टॅक्स लागू होतो. म्हणजेच आर्थिक वर्षात फायदा आणि तोटा हे धरून एकूण नक्त फायदा रक्कम टॅक्ससाठी गृहीत धरली जात असते.

शॉर्ट टर्म गेन टॅक्स दर किती आहे: शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा दर २०% आहे. म्हणजेच प्रतीकला २०% नुसार रु १०,०००/- कर लागू आहे. इक्विटी म्युच्युअल फंडसाठी हाच दर १५% इतका निश्चिक केलेला आहे.

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स : एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत जो भांडवली नफा मिळतो त्यास दीर्घकाळ म्हणजेच लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू पडतो.

उदा. अनुज ने १ ऑगस्ट २०२४ रोजी २ लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले आणि सप्टेंबर २०२५ मध्ये तीन लाख रुपयांना विकले तर एक लाख रुपये हा लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच नफा झाला. यावर नियमाने कर लागू पडतो.

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दर किती : २३ जुलै २०२४ पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्सवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स १०%, तर त्यानंतरच्या हस्तांतरित व्यवहारावर मिळणाऱ्या नफ्यावर १२.५०% आहे. पूर्वीच्या स्लॅबला १ लाख, तर नवीन स्लॅबमध्ये १.२५ लाखांच्या वरील भांडवली नफ्यावर हा कर लागू आहे. म्युच्युअल फंडसाठी हाच दर १०% इतका आहे.

इक्विटी मार्केटमधील व्यवहार करण्यापूर्वी भांडवली नफा नेमका किती लागू पडेल याचे गणित आधी मांडणे कधीही हितावह असते हे लक्षात घ्या. फायदा मोठा असेल तर हरकत नाही; परंतु छोट्या फायदा असेल आणि पुढे भविष्यात पुन्हा गुंतवणूक सुरू ठेवायची असेल तर नफा वसुली न करणे अधिक हितावह ठरते.

किंबहुना म्युच्युअल फंड दीर्घकाळासाठी असावा आणि त्यानंतर सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन करून लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मोठ्या प्रमाणात वाचविला जाऊ शकतो. अधिकृत म्युच्युअल फंड सल्लागार यात योग्य सल्ला देऊ शकतात.