आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:34 IST2026-01-01T08:30:53+5:302026-01-01T08:34:42+5:30
केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल ‘लॉटरी’; पीएफ कधीही काढता येणार; कार खरेदीसाठी मोजा अधिक पैसे; क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार; शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी आवश्यक होणार

१ जानेवारी २०२६ ची सकाळ केवळ नवीन वर्षाचा उत्साहच नाही, तर खिशावर परिणाम करणारे अनेक बदल घेऊन आली आहे. पगारवाढीच्या आनंदापासून ते बँकिंग नियमांच्या कडक अंमलबजावणीपर्यंत, हे बदल प्रत्येकावर परिणाम करणारे आहेत. याबाबत तयारी न केल्यास दंड किंवा आर्थिक अडथळे येऊ शकतात.

एलपीजी, सीएनजी स्वस्त? सिलिंडरच्या किमतीत ३० ते ५० रुपयांची कपात होण्याची शक्यता. १ जानेवारीपासून सीएनजी दरात कपातीचे संकेत आहेत.

कार खरेदी महागणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, उत्पादन खर्चामुळे वाहन कंपन्यांनी १ जानेवारी २०२६ पासून आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबिल दर ७ दिवसांनी बदलणार - आतापर्यंत क्रेडिट स्कोअर (सीबिल) महिन्याला अपडेट व्हायचा, पण १ जानेवारीपासून तो दर आठवड्याला अपडेट होईल. यामुळे कर्जाचा हप्ता चुकल्यास त्याचा परिणाम तात्काळ तुमच्या रेटिंगवर दिसेल. दुसरीकडे, नियमित हप्ते भरणाऱ्यांना याचा फायदा होऊन लवकर कर्ज मिळू शकेल.

पीएफच्या नियमांत मोठे बदल- ईपीएफओने पैसे काढण्याच्या जाचक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता तातडीच्या कामासाठी तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी कागदपत्रांच्या जंजाळात अडकावे लागणार नाही.

पूर्वी असलेल्या १३ वेगवेगळ्या अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सी किंवा लग्नासाठी पीएफ काढताना आता पूर्वीसारखी कागदपत्रांची लांबलचक प्रक्रिया करावी लागणार नाही.

८ वा वेतन आयोग : पगार, पेन्शनमध्ये मोठी वाढ केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे ८ व्या वेतन आयोगाची संभाव्य अंमलबजावणी. १ जानेवारी २०२६ पासून हा आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २० ते ३५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यामुळे सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांचे उत्पन्न वाढेल.

शेतकरी आयडी अनिवार्य पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 'डिजिटल फार्मर आयडी' अनिवार्य होत आहे. हा आयडी नसल्यास वार्षिक ६००० रुपयांचा हप्ता अडकेल.

बँकिंग, एफडी व्याजदर एसबीआय, एचडीएफसी आणि पीएनबी यासारख्या मोठ्या बँका मुदत ठेवींच्या आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करण्याची शक्यता आहे. गृहकर्जाचे दरही बदलतील..

डिजिटल पेमेंट आणि सुरक्षा ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ अधिक कडक होईल. युजर्सना अधिक सुरक्षित, काहीशा किचकट प्रक्रियेतून जावे लागू शकते.

पॅन-आधार लिंक ज्यांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड १ जानेवारीपासून निष्क्रिय होईल. यामुळे बँक खाते उघडणे, आयटी रिटर्न भरणे, मोठे व्यवहार करणे अशक्य होईल.

व्हॉट्सॲप, टेलिग्रामसाठी... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी मेसेजिंग ॲप्सवर नवे नियम लागू होतील. वेब व्हर्जन आता दर ६ महिन्यांनी आपोआप लॉगआऊट होईल.

नवा कायदा आणि फॉर्म १९६१ चा जुना इन्कम टॅक्स कायदा बदलून नवा कायदा येईल. नवीन टॅक्स फॉर्ममध्ये बँक व्यवहार आणि खर्चाची सविस्तर माहिती द्यावी लागेल.

















