UPI vs UPI Lite; दोन्हीत काय फरक आहे? ट्रांझॅक्शनची लिमिट किती? जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 02:40 PM2022-09-27T14:40:07+5:302022-09-27T14:46:08+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात UPI Lite लाँच केले आहे. हे नॉर्मल UPI पेक्षा थोडेसे वेगळ आहे.

UPI and UPI Lite: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात UPI लाइट लाँच केले. UPI Lite हे UPI पेक्षा कसे वेगळे आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. आजकाल बहुतांश लोक दैनंदिन व्यवहारांसाठी यूपीआय पेमेंटचा वापर करतात. त्यांचे पेमेंट करण्याचे अॅप्स वेगवेगळे असतील, मात्र मुख्य तंत्रज्ञान यूपीआयचेच असते. आता आरबीआयने UPI Lite नावाचे एक नवीन अॅप लॉन्च केले आहे.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस त्यालाच UPI म्हणतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. UPI ही 24x7 इन्स्टंट पेमेंट सिस्टम आहे, जी तुम्हाला दोन बँक खात्यांमध्ये थेट पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. NPCI वेबसाइटनुसार, UPI इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस किंवा IMPS इन्फ्रास्ट्रक्चरवर तयार केलेले तंत्रज्ञान आहे.

NPCI वेबसाइटनुसार, सध्या प्रति UPI व्यवहाराची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. यात तुम्ही केलेले प्रत्येक व्यवहार बँकेच्या ट्रांझॅक्शनमध्येही दिसते. पण, आता लहान-लहान ट्रांझॅक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात UPI लाइट लाँच केले आहे. हे एक 'ऑन-डिव्हाइस वॉलेट' आहे, ज्यातून UPI पिन न वापरता लहान-लहान पेमेंट करता येते.

UPI ​​Liteमध्ये केलेले व्यवहार तुमच्या बँक खात्यात दिसत नाहीत. हे अॅप वापरण्यसाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून अॅपच्या वॉलेटमध्ये पैसे टाकावे लागतात. यानंतर, तुम्ही ते पैसे UPI ​​Lite द्वारे पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. NCPI च्या प्रेस रिलीझनुसार, सध्या UPI Lite फक्त BHIM अॅपवर सुरू आहे आणि आठ बँकांना यात जोडले आहे.

यात, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, UPI लाइट लहान रकमेच्या व्यवहारांसाठी डिझाइन केले आहे.

UPI Liteवर व्यवहाराची मर्यादा फक्त 200 रुपये आहे. NPCI वेबसाइटनुसार, UPI Lite द्वारे 200 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी युजर्सना UPI पिनची गरज नाही. विशेष म्हणजे, NPCI ने सांगितल्यानुसार, सुरुवातीला UPI Lite जवळजवळ ऑफलाइन मोडमध्ये काम करेल. म्हणजेच डेबिट (पेमेंट) इंटरनेट कनेक्शनशिवाय करता येईल. NPCI नुसार, सध्या तुमच्या वॉलेटमधून फक्त डेबिट करण्याची परवानगी आहे. UPI Lite चे सर्व क्रेडिट्स रिफंडसह थेट तुमच्या बँक खात्यात जातील.