Post Office ची 'ही' स्कीम की बँकेची एफडी, कशात मिळेल ज्येष्ठ नागरिकांना जास्त फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 03:35 PM2023-02-25T15:35:20+5:302023-02-25T15:40:36+5:30

Post office schemes Vs Bank FD: पाहा कशात ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त फायदा.

निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला पुढील आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये याची काळजी असते. अशा स्थितीत नोकरीसोबतच निवृत्तीची तयारी करायला हवी. चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्ही रिटायरमेंट फंडासाठी कुठे गुंतवणूक करावी? हा प्रश्न तसा कठीण आहे.

तसे, बँका आणि सरकारकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीचे अनेक पर्याय आहेत. मात्र जास्त नफा कुठे मिळणार, हा विचार करण्याची बाब आहे. तुमच्यासाठी बँक एफडी किंवा पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना काय उत्तम ठरू शकते ते आपण या ठिकाणी पाहू.

पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना उत्तम व्याजदर मिळतो. बँका फक्त ६ टक्क्यांपर्यंत व्याज देत होत्या तेव्हाही या योजनेत नागरिकांना चांगला परतावा मिळत होता. परंतु मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केली आहे. त्यानंतरच अनेक बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये ते ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर ८ टक्क्यांपर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले होते. हे दर जानेवारी-मार्च तिमाहीसाठी आहेत. त्याच वेळी, अॅक्सिस बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर २ वर्षे ते ३० महिन्यांच्या FD वर जास्तीत जास्त ८.०१ टक्के व्याज दर देत आहे.

त्याच वेळी, ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ३.५० टक्के ते ७.७५ टक्क्यांपर्यंतचा व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी, स्टेट बँक २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. HDFC बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या कालावधीबद्दल सांगायचे तर, ज्येष्ठ नागरिक एकूण ५ वर्षांसाठी यामध्ये पैसे गुंतवू शकतात. या योजनेत तुम्ही ५ वर्षांची गुंतवणूक आणखी ३ वर्षांसाठी वाढवू शकता. दुसरीकडे, बँक एफडीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही त्यात ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकता.

SCSS योजनेत गुंतवणूक केल्यावर, ज्येष्ठ नागरिकांना आयकराच्या कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट मिळते. तर FD मध्ये, ही सूट फक्त ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर उपलब्ध आहे.

2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी SCSS योजनेसाठी सांगितले की तिची ठेव मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, योजनेतील किमान गुंतवणूक मर्यादा फक्त १ हजार रुपये आहे.

त्याच वेळी, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार बँकेत २ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची बल्क एफडी मिळू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला कमी वेळेत मजबूत परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक उत्तम पर्याय आहे.