टीका झाली पाहिजे, परंतु राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर नाही : गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:28 PM2021-09-21T16:28:50+5:302021-09-21T16:35:04+5:30

Gautam Adani : अदानी यांचा रामकृष्ण बजाज मेमोरिअल ग्लोबल पुरस्कारानं करण्यात आला सन्मान.

देशातील दिग्गज उद्योजकांपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांनी देशात कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा बचाव केला आहे. प्रियदर्शनी अकादमीच्या जागतिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात संबोधित करताना त्यांनी यावर भाष्य केलं.

टीका राष्ट्रीय मान-सन्मान आणि देशाच्या विश्वासाला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर केली जाऊ नये, असं अदानी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान अदानी यांचा रामकृष्ण बजाज मेमोरिअल ग्लोबल पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

भारतानं ज्या प्रकारे कोरोनाच्या महासाथीचा सामना केला तो सर्वांसाठीच एक धडा आहे. भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भर बनण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असंही ते म्हणाले.

पुढील दोन दशकांमध्ये भारतात सर्वात मोठी आणि तरूण मध्यमवर्गीय लोकसंख्या असेल. भारत हा एक असं मार्केट बनेल ज्याकडे प्रत्येक जागतिक कंपनीला यावंसं वाटेल, असंही अदानी यांनी यावेळी नमूद केलं.

आपण हे विसरू नये की साथीच्या आजाराशी लढण्यासाठी आपण एकटे पडलो होतो. याचा अर्थ असा नाही की टीका होऊ शकत नाही, परंतु ही टीका राष्ट्रीय प्रतिष्ठेला आणि विश्वासाला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर असू नये. समाजात फूट पाडण्याचा हेतू नसावा. अन्यथा ज्यांना भारताची प्रगती बघायची इच्छा नाही त्यांच्या हातचं बाहुलं बनू, असंही त्यांनी नमूद केलं.

हरित जगासाठी शाश्वत तंत्रज्ञान असो किंवा भारताला जोडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, अधिक साक्षर भारतासाठी शैक्षणिक उपाय, निरोगी भारतासाठी वैद्यकीय उपाय, शेतकऱ्यांसाठी कृषी उपाय किंवा इतर अनुकूल पायाभूत सुविधा. नजीकच्या काळात या हजारो अब्जावधी डॉलर्सच्या संधी असतील, असं अदानी म्हणाले.

या सर्व गोष्टी आत्मनिर्भर बनण्याचा पाया रचतील. हा प्रवास आपल्या देशातील कंपन्यांनी पुढे नेला पाहिजे. निरनिराळ्या देशांमधील व्यापार आणि एकीकरण अधिक दृढ होणं हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला.