'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:53 IST2025-12-04T17:09:22+5:302025-12-05T09:53:58+5:30

Rolex Cost : रोलेक्स हे केवळ घड्याळ नाही, तर यशस्वी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे. आजच्या काळात रोलेक्सच्या घड्याळांना असलेली मागणी, त्याची किंमत आणि वेटींग पीरियड पाहून आश्चर्य वाटते. कंपनीने वापरलेल्या खास मार्केटिंग धोरणांमुळे हे शक्य झाले आहे.

१९०५ मध्ये हॅन्स विल्सडॉर्फ यांनी कंपनी सुरू केली, तेव्हा रिस्ट वॉच (हातातील घड्याळ) अचूक मानले जात नव्हते. त्यांनी पॉकेट वॉचपेक्षा अधिक अचूक टाइम दाखवणारी रिस्ट वॉच बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक प्रयोग करून त्यांनी जगातल्या सर्वात 'अचूक' रिस्ट वॉचचा पाया रचला.

१९१९ मध्ये कंपनीचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे हलवण्यात आले. त्या काळात 'स्विस मेड' घड्याळे जगभरात सर्वोत्तम अचूकतेसाठी ओळखली जात होती. रोलेक्सच्या घड्याळांवर 'स्विस मेड' टॅग लागल्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली आणि विक्रीत मोठा फायदा झाला.

१९२६ मध्ये रोलेक्सने जगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ तयार केले. या शोधानंतर रोलेक्सने घड्याळांची अचूकता तसेच बाहेरील वातावरणीय घटक जसे की पाणी आणि धूळ यांपासून घड्याळ सुरक्षित केले. यामुळे 'ऑयस्टर' या नावाचे हे घड्याळ जगभर प्रसिद्ध झाले.

रोलेक्सचे संस्थापक हॅन्स विल्सडॉर्फ यांनी पारंपरिक जाहिरातबाजी टाळून इवेंट मार्केटिंगचा अनोखा मार्ग निवडला. पाण्यातील चाचणीसाठी त्यांनी जलतरणपटू मर्सिडीज ग्लीट्जला ते वॉटरप्रूफ घड्याळ परिधान करण्यास सांगितले. अशा प्रकारे, प्रत्यक्ष कृतीतून उत्पादन सिद्ध करून कंपनीने स्वतःची विश्वासार्हता वाढवली.

रोलेक्स घड्याळे सामान्य घड्याळांपेक्षा वेगळी असतात, कारण त्यामध्ये अत्यंत महागडे स्टील (सर्वात महागडे आणि उच्च दर्जाचे '९०४एल' स्टील), सोने आणि प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू वापरले जातात. या उच्च दर्जाच्या सामग्रीमुळे त्यांची किंमत नेहमी लाखोंच्या घरात असते.

समुद्राच्या खोलवर किंवा पर्वतांच्या उंच शिखरांवरही रोलेक्सची घड्याळे अचूक वेळ सांगतात. त्यांचे उच्च दर्जाचे मटेरियल, मजबूत रचना आणि अत्यंत कमी देखभाल यामुळे ती इतर घड्याळांपेक्षा जास्त टिकाऊ आणि उत्कृष्ट ठरतात.

कंपनीची सुरुवात 'विल्सडॉर्फ अँड डेविस' या नावाने झाली होती. हे नाव घड्याळाच्या डायलवर लिहिण्यासाठी खूप मोठे होते. त्यामुळे, ब्रँड पटकन ओळखला जावा या विचाराने १९०८ मध्ये कंपनीचे नाव बदलून आकर्षक आणि छोटे 'रोलेक्स' असे ठेवण्यात आले.

१९१९ मध्ये लंडन सरकारने कर इतका वाढवला की, कंपनीचा नफा मार्जिन जवळजवळ संपुष्टात आला. त्यामुळे हॅन्स विल्सडॉर्फ यांनी सर्व कामकाज स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये हलवले. यामुळे त्यांची उत्पादन खर्च तर वाचलाच, पण स्विस मेडचा फायदाही मिळाला.

रोलेक्स घड्याळांची निर्मिती अतिशय काळजीपूर्वक आणि कुशलतेने केली जाते, ज्यामुळे त्यांचा पुरवठा नेहमीच मागणीपेक्षा कमी असतो. याच कारणामुळे ओरिजनल रोलेक्स घड्याळ खरेदी करण्यासाठी तुम्हाला ४ ते ५ वर्षांपर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे लोकांमध्ये याची क्रेझ कायम राहते.

रोलेक्सने फक्त वेळ सांगणारे उपकरण तयार केले नाही तर एक स्टेटस सिम्बॉल प्रस्थापित केले आहे. अब्जाधीश, खेळाडू आणि यशस्वी व्यावसायिक हे रोलेक्स परिधान करतात, ज्यामुळे ही घड्याळे 'खास' लोकांची ओळख बनली आहेत.