TATA News: मेटा आणि ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा सरसावले, 'या' कंपनीत देणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:44 AM2022-11-19T11:44:30+5:302022-11-19T11:59:51+5:30

TATA News: निरनिराळ्या देशांमध्ये कंपनी शेकडो लोकांना जॉब देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेटा आणि ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना आता टाटांनी मदतीचा हात दिला आहे.

जागतिक मंदीचे (Recession in World) पडसाद जगभर दिसू लागले आहेत. अमेरिकेतील अनेक मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर रोजगाराचे संकट निर्माण होऊ लागले आहे.

अशा परिस्थितीत भारतातील दिग्गज टाटा कंपनीने अशा मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. टाटा मोटर्सने आपल्या ब्रिटीश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरमध्ये (Jaguar Land Rover) मेटा आणि ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे.

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार जग्वार लँड रोव्हर जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आली आहे. आता ट्विटर, मेटा आदी मोठ्या कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेससोबतच डिजिटल सेवेत काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.

टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हरने सांगितले की, यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना रोजगार मिळेल. कंपनीने आश्वासन दिले आहे की सध्या सुमारे 800 नवे रोजगार निर्माण केले जातील. यामध्ये डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिफिकेशन, क्लाउड सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग इत्यादीसारख्या अनेक क्षेत्रातील लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन, हंगेरी, आयर्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये 800 लोकांना नोकऱ्या देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

यासोबतच भारतातही लवकरच नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. आयफोन निर्माता Apple ने बंगळुरूमधील होसूर जवळ आपला कारखाना सुरू केला आहे, ज्याद्वारे ते भारतातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले जातील. याबाबत माहिती देताना दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशभरात 60 हजारांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत.

ट्विटर आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटाने अलीकडच्या काळात हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. इलॉन मस्कच्या ट्विटर टेकओव्हरनंतर त्यांनी सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याशिवाय फेसबुकच्या मूळ कंपनीनेही आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

याशिवाय ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, जॉन्सन अँज जॉन्सन, Vegan meat maker Beyond Meat Inc, ऑनलाइन बँकिंग फर्म चाइम, फिलिप्स 66, Arrival SA सारख्या अनेक कंपन्यांनी खर्चात कपात करण्यासाठी कामगारांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.