सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:12 IST2025-12-29T15:07:53+5:302025-12-29T15:12:20+5:30

TAFCOP Portal : आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार लोकांच्या नावावर किंवा बनावट आयडीवर सिम कार्ड मिळवून आर्थिक फसवणूक करत आहेत. तुमच्या नावावर असलेले सिम जर दुसऱ्या कोणी गुन्ह्यासाठी वापरले, तर तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता.

भारत सरकारच्या नियमांनुसार, एक व्यक्ती आपल्या आयडीवर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड घेऊ शकते. मात्र, जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी ही मर्यादा ६ सिम कार्ड इतकीच मर्यादित आहे.

तुमच्या नावावर किती सिम सक्रिय आहेत हे तपासण्यासाठी दूरसंचार विभागाने 'TAFCOP' नावाचे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही सर्व सक्रिय नंबरची यादी पाहू शकता.

सर्वात आधी वरील वेबसाईटवर जाऊन तुमचा मुख्य मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा 'कॅप्चा कोड' टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करून 'व्हॅलिडेट'वर क्लिक करा.

लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर त्या सर्व मोबाईल नंबरची यादी दिसेल, जे तुमच्या नावावर किंवा आयडीवर सध्या सुरू आहेत. हे नंबर काळजीपूर्वक तपासा.

जर या यादीमध्ये तुम्हाला असा एखादा नंबर दिसला जो तुम्ही कधीही खरेदी केलेला नाही किंवा जो तुम्ही सध्या वापरत नाही, तर तुम्ही तिथेच त्या नंबरसमोर दिलेल्या पर्यायावर क्लिक करून तो 'Report' करू शकता.

अनोळखी नंबरची तक्रार केल्यावर दूरसंचार विभाग त्या नंबरची चौकशी करते आणि तो कायमचा ब्लॉक करते. तक्रार केल्यानंतर तुम्हाला एक 'रेफरन्स नंबर' मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता.

वेळोवेळी या पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर असलेले नंबर तपासणे ही एक चांगली सवय आहे. यामुळे तुमची ओळख सुरक्षित राहते आणि तुमच्या नावावर भविष्यात होणारी फसवणूक टाळता येते.