15 मजल्यांचे 9 टॉवर्स, 4700 कार्यालये... सूरत डायमंड बोर्स आहे पेंटागॉनपेक्षा मोठे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:16 PM2023-12-21T14:16:45+5:302023-12-21T14:26:30+5:30

surat diamond bourse : सूरत डायमंड बोर्स हे 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी ( दि. 17) जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कॉम्प्लेक्स 'सूरत डायमंड बोर्स'चे (SDB) उद्घाटन केले. हे कॉम्प्लेक्स गुजरातमधील सुरतमध्ये आहे. याला गुजरातचे आर्थिक केंद्र म्हटले जाते.

सूरत डायमंड बोर्स हे डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल (ड्रीम) सिटीचा भाग आहे. सूरत डायमंड बोर्स हे 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल आहे.

सूरत डायमंड बोर्स हे सुरत शहराजवळील खजोद गावात आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत अमेरिकेतील संरक्षण मुख्यालय पेंटागॉन (65 लाख चौरस फूट) पेक्षा देखील मोठे आहे. सूरत डायमंड बोर्स कॉम्प्लेक्स 3200 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे.

2015 मध्ये गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सूरत डायमंड बोर्सची पायाभरणी केली होती. तब्बल 8 वर्षांनी ते जुलैमध्ये पूर्ण झाले. या संपूर्ण सूरत डायमंड बोर्सच्या मेगास्ट्रक्चरमध्ये नऊ 15-मजली ​​टॉवर्स आहेत. ज्यामध्ये सर्व मिळून जवळपास 4,700 कार्यालये आहेत.

एक्स्चेंजचा आकार इस्त्राईल डायमंड एक्सचेंजपेक्षाही मोठा आहे, जो 80,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रात पसरलेला आहे आणि 1000 हून अधिक कार्यालये आहेत. उद्घाटनापूर्वीच मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपली कार्यालये ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, या प्रकल्पामुळे हिरे उद्योगाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. खडबडीत आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.