मुलीचं उच्च शिक्षण आणि लग्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून उभा करता येईल ७० लाखांचा फंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:32 IST2025-01-05T10:08:52+5:302025-01-05T10:32:29+5:30

Sukanya Samriddhi Yojana : जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते उघडले तर यातून तो ७० लाख रुपयांपर्यंत निधी जमा करू शकतो.

सध्याच्या महागाईच्या काळाच मुलांचे उच्च शिक्षण आणि विवाह यावर सर्वाधिक खर्च होतो. सर्वसामान्य लोकांना तर या दोन्ही गोष्टींसाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाहीत. अनेकजण या कर्जाच्या ओझ्याखालीच दबतात. पण, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या जन्मापासूनच थोडे पैसे गुंतवत राहिलात तर तुम्ही या खर्चासाठी मोठा फंड तयार करू शकता.

मुलीच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. ही एक छोटी बचत योजना आहे. ही सरकार समर्थित योजना आहे, ज्याचा व्याजदर सरकार दर ३ महिन्यांनी ठरवला जातो. सध्या ही योजना ८.२ टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. हा वार्षिक चक्रवाढ व्याजदर आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत पालक त्यांच्या १० वर्षांखालील मुलीचे खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी खाते एका कुटुंबातील फक्त २ मुलींसाठीच उघडता येते. जुळे किंवा तिळं झालं असेल तर २ पेक्षा जास्त खाती उघडता येतात.

या योजनेत, एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये जमा करता येतात. तुम्ही ही गुंतवणूक हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी करू शकता. खाते उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता.

या योजनेतील गुंतवणुकीची रक्कम, व्याजाचे उत्पन्न आणि मॅच्युरिटी रक्कम या सर्व करमुक्त आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते उघडले तर तो त्याचे योगदान १५ वर्षांसाठी जमा करू शकतो. यानंतर ६ वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. या कालावधीत कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. परंतु, व्याज मिळत राहते.

या योजनेत मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम काढता येईल. या योजनेत वर्षभरात १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा लाभही उपलब्ध आहे.

समजा तुमची मुलगी १ वर्षाची झाल्यावर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडले. जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षात दीड लाख रुपये गुंतवले, तर जेव्हा मुलगी २१ वर्षांची होईल म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी, तेव्हा एकूण ६९,२७,५७८ रुपये निधी जमा होईल. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम २२,५०,००० रुपये असेल आणि व्याज उत्पन्न ४६,७७,५७८ रुपये असेल.