Success Story : स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर विकलं; नंतर ११० कोटींना कंपनी विकली, आता उभं केलं १००० कोटींचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:11 IST2025-01-08T08:56:09+5:302025-01-08T09:11:36+5:30

Success Story Viraj Bahl : विराज बहल हे देशातील एक यशस्वी उद्योजक आहेत. शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये ते नवीन शार्क म्हणून सामील झाले आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

Success Story Viraj Bahl : विराज बहल हे देशातील एक यशस्वी उद्योजक आहेत. शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये ते नवीन शार्क म्हणून सामील झाले आहे. अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनीता सिंह आणि पियुष बन्सल हे देखील शार्क्सच्या पॅनेलमध्ये आहेत. विराज बहल यांनी अथक परिश्रमातून आपला व्यवसाय उभा केलाय.

ते भारताच्या एफएमसीजी क्षेत्र, विशेषत: सॉस उत्पादक वीबा फूड्सचे (Veeba Foods) संस्थापक आणि एमडी म्हणून ओळखलं जातं. २०१३ मध्ये सुरू झालेला वीबा फूड्स आज एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. यामुळे भारतीय फूड बिझनेसला नवं रूप प्राप्त झालंय. पण, विराज यांचा मार्ग सोपा नव्हता. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.

सुरुवातीच्या धक्क्यांपासून ते आर्थिक अडचणींपर्यंत विराज बहल यांनी प्रत्येक आव्हानाला तोंड दिलं. प्रबळ इच्छाशक्ती हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. विराज बहलच्या यशाच्या वाटचालीवर एक नजर टाकू.

विराज हे लहानपणापासूनच फूड बिझनेसशी संबंधित आहे. ते अनेकदा वडिलांच्या फॅक्ट्रीमध्ये जात असत. त्यांची पहिली नोकरी दिल्ली ट्रेड फेअरमधील फन फूड्सच्या स्टॉलवर होती. लहानपणापासूनच त्यांना फूड प्रोसेसिंगची आवड निर्माण झाली. मात्र, विराज यांनी आधी स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं, अशी त्यांचे वडील राजीव बहल यांची इच्छा होती. विराज यांनी मरीन इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आणि चांगली नोकरी मिळवली. यशस्वी करिअर करूनही विराज यांचं मन कौटुंबिक व्यवसायातच राहिलं.

वडिलांच्या परवानगीनंतर विराज २००२ मध्ये फन फूड्समध्ये रुजू झाले. राजीव बहल यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी झपाट्यानं वाढत होती. पुढच्या सहा वर्षांत विराज यांनी फन फूड्सला एका नामांकित ब्रँडमध्ये रुपांतरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

परंतु, त्यांच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट २००८ मध्ये आला जेव्हा त्याच्या वडिलांनी फन फूड्स जर्मन कंपनी डॉ. ओटकर यांना ११० कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. विराज यांचा त्याला विरोध होता. परंतु, ही कंपनी विकण्यात आली. भावनिक आणि व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता

यानंतर विराज यांनी २००९ मध्ये 'पॉकेट फुल' नावाचा रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला. परंतु, चार वर्षांनंतर हा व्यवसाय तोट्यात सुरू झाला. २०१३ पर्यंत सहाही दुकानं बंद झाली. यामुळे त्यांच्या समोर आर्थिक संकट उभं राहिलं, पण त्यांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या पाठिंब्यामुळे विराज यांनी नव्यानं सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आपलं घर विकून नव्या व्यवसायासाठी पैसे गोळा केले. यावेळी विराज यांनी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीत पुनरागमन केलं आणि २०१३ मध्ये राजस्थानमधील नीमराणा येथे वीबा फूड्सची स्थापना केली. गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करणारी विबा लवकरच अग्रगण्य सॉस मेकर बनली. त्याला देशभरात मान्यता मिळाली.

वीबा फूड्सने गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. कंपनीनं २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळविण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. वीबा फूड्स अद्याप शेअर बाजारात लिस्ट झाली नसली तरी विराज यांचा कंपनीतील मोठा हिस्सा आणि गुंतवणूकदारांचा पाठिंबा यामुळे कंपनीच्या वाढीस मदत होत आहे. विराज यांच्या नेतृत्वाखाली वीबानं केवळ फूड प्रोसेसिंग उद्योगातच क्रांती घडवून आणली नाही तर भारतीय एफएमसीजी क्षेत्रातही एक मोठं नाव बनवलं आहे. या कंपनीचं नाव त्यांची आई विभा बहल यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय.