छोटं दुकान, मोठी स्वप्न; मल्ल्याची कंपनी विकत घेऊन धिंग्रा बंधूंनी उभा केला ₹५६००० कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:50 AM2023-10-04T09:50:37+5:302023-10-04T10:03:36+5:30

आजची गोष्ट मल्ल्याची नसून दोन भावांची आहे ज्यांनी त्याची बुडती कंपनी विकत घेऊन ती कोट्यवधींची केली.

किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या फरार आहे. भारतीय बँकांचे पैसे घेऊन फरार झालेल्या मल्ल्याने भारतातील आपला व्यवसायही बुडवला. पण आजची गोष्ट मल्ल्याची नसून दोन भावांची आहे ज्यांनी त्याची बुडती कंपनी विकत घेऊन ती कोट्यवधींची केली.

पंजाबच्या एका छोट्या शहरात दुकान चालवणाऱ्या धिंग्रा बंधूंनी मोठी जोखीम उचलली आणि मल्ल्याच्या बुडणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवले. धिंग्रा बंधूंनी जे केलं ते क्वचितच कोणी केलं असेल. साधं दुकान चालवणाऱ्या धिंग्रा बंधूंनी विजय मल्ल्याकडून एक कंपनी विकत घेतली आणि ५६ हजार कोटींचा व्यवसाय उभा केला.

कुलदीपसिंग धिंग्रा आणि गुरबचनसिंग धिंग्रा एकेकाळी पंजाबमध्ये दुकान चालवत होते. त्यांचं कुटुंबही पंजाबशी संबंधित आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी अमृतसरमध्ये दुकान सुरू केलं होतं.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर दोघेही कुटुंबाच्या वडिलोपार्जित व्यवसायात सहभागी झाले. धिंग्रा बंधू सुशिक्षित होते, त्यामुळे त्यांनी त्याच पद्धतीनं आपलं दुकान चालवलं. धिंग्रा बंधूंचं दुकान शहरात खूप प्रसिद्ध होतं.

एके दिवशी त्यांना मल्ल्याचा यूबी समूह त्यांची पेंट कंपनी विकत आहे याची माहिती मिळाली. हे दोघेही मित्राच्या मदतीनं मल्ल्याला भेटायला गेले आणि एकाच बैठकीत हा करार झाला. या दोघांनी बुडत असलेली मल्ल्याची कंपनी विकत घेतली. त्यावेळी ती कंपनी देशातील सर्वात लहान पेंट उत्पादन करणारी कंपनी होती.

त्याच्या हातात बुडणारी कंपनी होती, जी उभी करण्यासाठी त्यांनी रात्र दिवस मेहनत केली. कंपनी नव्यानं सुरू झाली आणि तिचं नाव ठेवण्यात आलं बर्जर पेंट्स. १९७० मध्ये त्या कंपनीची उलाढाल १० लाख रुपये होती. ही कंपनी उभी करण्यासाठी दोन्ही भावांनी खूप प्रयत्न केले. यामुळे, अवघ्या १० वर्षांत, बर्जर पेंट्स सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठी पेंट निर्यातक बनली. त्यानंतर मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

आज बर्जर पेंट ही देशातील दुसरी सर्वात मोठी पेंट उत्पादन कंपनी आहे. दोन्ही भावांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कर्जबाजारी कंपनी ५६००० कोटी रुपयांची केली. कुलदीप धिंग्रा आणि गुरबचन धिंग्रा हे मोठे उद्योगपती झाले.

कुलदीप आणि गुरबचन यांच्या अहोरात्र मेहनतीचा परिणाम म्हणजे बर्जर पेंट्स केवळ भारतातच नव्हे तर रशिया, पोलंड, नेपाळ आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये व्यवसाय करत आहे. कंपनीचे मूल्य ५६ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. कंपनीतील दोन्ही भावांचा हिस्सा २९,७००-२९,७०० कोटींपेक्षा (३.६ बिलियन डॉलर्स) जास्त आहे.