आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 06:22 PM2024-05-27T18:22:51+5:302024-05-27T18:24:48+5:30

Assembly Elections 2024 : 

Free electricity will now be available in Odisha, Chief Minister Naveen Patnaik's big announcement | आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक यांनी सोमवारी (२७ मे) राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली. केंद्रपारा येथे आयोजित एका सभेला नवीन पटनायक यांनी संबोधित केले. यावेळी ओडिशात जुलैपासून कोणालाही वीज बिल भरावे लागणार नाही. बीजेडी सरकार जनतेला मोफत वीज देणार आहे, असे नवीन पटनायक यांनी सांगितले.

या सभेत बीजेडी नेते आणि 5टी चे अध्यक्ष व्हीके पांडियन देखील उपस्थित होते. यावेळी व्हीके पांडियन म्हणाले की, राज्य सरकारच्या बीएसकेवाय योजनेंतर्गत लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळत राहतील. तसेच, लोकांना मोफत वीजही दिली जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय, नवीन पटनायक हे ९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा सुद्धा व्हीके पांडियन यांनी केला.

बीजेडीने आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा सरकार स्थापन झाल्यास १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. बीजेडी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास बचत गटांना २० लाख रुपयांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जासह अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

दरम्यान, १०० ते १५० युनिट वीज वापरावरही ग्राहकांना सवलत दिली जाईल, असा दावा पक्षाने केला होता. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील ७५ टक्के घरे १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे.

नवीन पटनायक मुख्यमंत्री झाले तर 'हा' विक्रम होईल
ओडिशा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नवीन पटनायक गंजाम जिल्ह्यातील हिंजली विधानसभा मतदारसंघातून राजकीय मैदानात उतरले आहेत. नवीन पटनायक २००० पासून सलग पाच वेळा या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यावेळीही विजयी झाले तर भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम नवीन पटनायक यांच्या नावावर नोंदवला जाईल. दरम्यान, ओडिशामध्ये १ जून रोजी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. ओडिशाच्या लोकसभा आणि विधानसभा जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.

Web Title: Free electricity will now be available in Odisha, Chief Minister Naveen Patnaik's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.