पीएमसी बँकेला कंगाल करणाऱ्या कंपनीची होणार विक्री, अदानींसह हे उद्योजक खरेदीसाठी उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 09:45 AM2020-08-05T09:45:14+5:302020-08-05T09:55:01+5:30

हाऊसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल कंपनी विक्रीच्या मार्गावर आहे. दिवाळखोरीबाबतच्या एनसीएलटी प्रक्रियेंतर्गत एचडीआयएलची विक्री केली जाणार आहे.

पीएमसी बँक आर्थिक अडचणीत सापडल्याने हजारो ठेवीदारांच्या अडचणीत आल्या होत्या. एचडीआयएल कंपनीने पीएमसी बँकेकडून घेतलेले हजारो कोटींचे कर्ज थकवल्याने पीएमसी बँक आर्थिक अडचणीत सापडली होती. दरम्यान, पीएमसी बँकेकडून घेतलेले हजारो कोटींचे कर्ज थकवणारी एचडीआयएल कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल कंपनी विक्रीच्या मार्गावर आहे. दिवाळखोरीबाबतच्या एनसीएलटी प्रक्रियेंतर्गत एचडीआयएलची विक्री केली जाणार आहे. तसेच या कंपनीच्या खरेदीसाठी अनेक उद्योगपतींनी उत्सुकता दाखवली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार अदानी प्रॉपर्टीजसह सहा कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एचडीआयएलचे अधिकग्रहण करण्यासाठी पुढे आल्या आहेत. अदानी प्रॉपर्टीजसह सुरक्षा अॅसेट रिकंस्ट्रक्शन आणि सनटेक रियालिटी यांनी एचडीआयएलची खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

एचडीआयएलने शेअर बाजाराला संभाव्य खरेदीदारांची एक अस्थायी स्वरूपाची यादी पाठवली आहे. या कंपनीचे मालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान आहेत. ते सध्या पीएमसी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

अदानी समूह मुंबईतील प्रॉपर्टी सेक्टरमध्ये पहिल्यापासूनच उपस्थित आहे. सध्या अदानी समुहाकडून मुंबईतील भायखळा परिसरात आपली प्रॉपर्टी विकसित करत आहे.

एचडीआयएलने दिलेल्या माहितीनुसार इओआयची अंतिम तारीख ३१ जुलै निश्चित करण्यात आली होती. यादरम्यान, एकूण सहा कंपन्यांनी इओआयसाठी अर्ज केला होता. मात्र इंटरनॅशनल अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीने आयबीसीचे कलम २९ अ अंतर्गत अंडरटेकिंग जमा केलेले नाही.

पीएमसी बँकेत एचडीआयएलचे खाते आहे. या कंपनीने बँकेमधून सुमारे दोन हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा भरणा कंपनीने केला नाही. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खराब झाली. तसेच खातेदारांना ठेवींचे पैसे परत देण्याइतपत स्थितीही बँकेची राहिली नाही.

एचडीआयएल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी असून, या कंपनीचा दहा वर्षभरापूर्वी मोठा कारभार होता. २००८ मध्ये एचडीआयएलचा शेअर एक हजार रुपयांपेक्षा अधिक होता. मात्र नंतर या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण होऊन तो दीड रुपयांपर्यंत खाली आला. सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत ३ रुपयांच्या आसपास आहे.