१ लाखाचे झाले २.७९ कोटी! ₹ २ पेक्षाही कमी किमतीच्या शेअरची कमाल, १५ वर्षांत २७७७५ टक्क्यांचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 23:16 IST2026-02-08T23:10:50+5:302026-02-08T23:16:11+5:30

गेल्या १५ वर्षांपेक्षाही कमी कालावधीत या शेअरने तब्बल २७७७५ टक्क्यांचा परतावा देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे...

शेअर बाजारातील 'स्मॉल-कॅप' शेअर्समध्ये असे अनेक शेअर्स असतात, जे आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवतात. सध्या असाच 'शिवालिक बायमेटल कंट्रोल्स लिमिटेड'चा (Shivalik Bimetal Controls Ltd) शेअर जबरदस्त चर्चेत आहे. गेल्या १५ वर्षांपेक्षाही कमी कालावधीत या शेअरने तब्बल २७७७५ टक्क्यांचा परतावा देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

शुक्रवारी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनीचा शेअर ५.७८ टक्क्यांनी वधारला आणि ४७९.४५ रुपयांवर जाऊन पोहोचला होता. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप २७६१.८३ कोटी रुपये एवढे आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑगस्ट २०१३ मध्ये, जेव्हा या शेअरची किंमत केवळ १.७२ रुपये होती, तेव्हा १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे मूल्य सुमारे २.७९ कोटी रुपये एवढे झाले असते. या छप्परफाड परताव्याने हा शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये आला आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष २०२६ साठी आपल्या महसूल वाढीच्या अंदाजात काहीसा बदल केला आहे. पूर्वी वर्तवलेला १२ ते १५ टक्क्यांचा अंदाज आता कमी करून १० टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आला आहे. बाजारपेठेतील सध्याची स्थिती आणि काही विभागांमधील सुस्तीमुळे हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

मात्र, दीर्घकालीन वाढीबाबत कंपनीला पूर्ण विश्वास आहे. आर्थिक वर्ष २७ मध्ये पीसीबीए (PCBA) विभागाकडून ५० ते ७० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हा 'फॉरवर्ड इंटिग्रेशन'चा टप्पा कंपनीसाठी मोठी संधी ठरू शकतो, असे व्यवस्थापनाला वाटते.

कंपनीचा नेमका व्यवसाय काय? शिवालिक बायमेटल कंट्रोल्स लिमिटेडची सुरुवात झाली १९८४ मध्ये. ही कंपनी थर्मोस्टॅटिक बायमेटल, ट्रायमेटल स्ट्रिप्स, कॉइल्स, स्प्रिंग्स आणि करंट सेन्स शंट्स यांसारख्या अचूक उपकरणांची (Precision Components) निर्मिती करते. यासाठी कंपनी इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग आणि डिफ्यूजन बॉन्डिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते.

या उपकरणांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. विशेषतः इलेक्ट्रिक वाहने (EVs), बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि एनर्जी मीटर्समध्ये कंपनीची मजबूत पकड आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)