प्रॅाफिटबाबत विचारणाऱ्या शार्क टँकच्या जजेसच्या कंपन्यांची कामगिरी कशी? हर्ष गोयंकांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:19 IST2025-01-29T09:06:18+5:302025-01-29T09:19:07+5:30

Shark Tank India : आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी शार्क टँक इंडियाच्या जजेसच्या कंपन्यांच्या स्थितीची आकडेवारी शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Shark Tank India : आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी शार्क टँक इंडियाच्या जजेसच्या कंपन्यांच्या स्थितीची आकडेवारी शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. गोएंका या शोचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील काही कंपन्यांच्या नफ्याची (करोत्तर) आकडेवारी शेअर केली आहे.

या अशा कंपन्या आहेत ज्यांचे प्रवर्तक शार्क टँक इंडियाचे जजेस आहेत. यावरून त्यांच्या कंपन्यांची आर्थिक कामगिरी दिसून येते. उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल या शोचे कौतुक करताना गोएंका यांनी शार्क्स टँकच्या जजेसची शाळा घेतली.

वास्तविक, या आकडेवारीवरून कंपन्यांचं मोठं नुकसान दिसून येतं. यामध्ये विनीता सिंह यांच्या शुगर कॉस्मेटिक्सला ६८ कोटी, अमन गुप्ता यांच्या बोटला ५४ कोटी, अनुपम मित्तल यांच्या कंपनीला १८ कोटी, लेन्सकार्टला १० कोटींचा तोटा झाल्याची माहिती त्यांनी शेअर केलीये. मात्र, सर्वात मोठा तोटा अॅको जनरल इन्शुरन्सला झाला, जो ४५६ कोटी रुपयांचा आहे. इनशॉर्ट्सला २२८ कोटी, तर ओयो रूम्सला १८४ कोटींचा तोटा झाल्याची माहिती त्यांनी शेअर केलीये.

"मला शार्क टँक पाहायला आवडतं. परंतु असं वाटतं की काही शार्क आताही उसळत्या लाटांमधूनच प्रवास करत आहेत. मी जितका विचार केला होता, त्यापेक्षा अधिक 'ब्लिडिंग' टँकमध्ये होत आहे," असं गोएंका म्हणाले.

हर्ष गोएंका यांनी शार्क टँक इंडियाच्या जजेसच्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. शोमध्ये असलेल्या जजेसच्या अनेक कंपन्या तोट्यात चालत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाची आकडेवारी सांगितली. यामध्ये शुगर कॉस्मेटिक्सला ६८ कोटी, बोटला ५४ कोटी आणि लेन्सकार्टला १० कोटी रुपयांचं नुकसान झालंय. अॅको जनरल इन्शुरन्स (४५६ कोटी), इनशॉर्ट्स (२२८ कोटी) आणि ओयो रूम्स (१८४ कोटी) यांचं सर्वाधिक नुकसान झालं. गोयंका यांनी या सीरिजवर आपलं प्रेम व्यक्त करताना काही शार्क कठीण काळातून जात असल्याचं म्हटलं.

गोएंका यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की "ज्या प्रकारे ते हे सर्व ग्रिल करतात, त्यावरून असं दिसतं की त्या देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या आहेत." आणखी एका युजरनं म्हटलं की, "मला अजूनही समजलेलं नाही की शार्क पिचर्सच्या व्यवसायात केवळ नफा कमावण्याची अपेक्षा का करतात आणि त्यांच्याच कंपन्या नफा कमावण्यासाठी बराच काळ धडपडत आहेत." आणखी एका युजरनं लिहिलंय की, 'सगळे चांगले शार्क आहेत. शार्क कंपन्या रोजगार निर्मितीला हातभार लावत असतील तर काही कोटी मान्य आहेत. कालांतराने कंपन्या नफ्यात येतात.'

गोएंका यांनी शार्कच्या आर्थिक कामगिरीवर बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी अशीच एक पोस्ट केली होती ज्याला अनुपम मित्तल यांनी उत्तर दिलं होतं. मित्तल यांनी गोएंका यांच्या वक्तव्याची कबुली देत उद्योजकतेचा बचाव केला होता. त्यासोबत येणारे धोके आणि आव्हानं यावर त्यांनी भर दिला होता.

"मला माहित आहे की तुम्ही हे गमतीनं बोललात, म्हणून सर, मला वाटतं की तुम्ही वरवरच्या, पक्षपाती आणि अपूर्ण डेटाला प्रतिसाद दिला. दिग्गजांकडून शिकणं आनंददायक आहे, परंतु जसं आपण स्पष्ट केले आहे की, शार्क लाल रंगाच्या पाण्यातून वाहत नाहीत, तर आम्ही निळ्या रंगाच्या पाण्यातून वाहतो आणि म्हणून आम्ही जे करतो ते करतो," असं अनुपम मित्तल म्हणाले.