कमाईमध्ये SBI ठरली 'नंबर वन'; रिलायन्स आणि TCS ची काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 08:42 AM2024-02-19T08:42:57+5:302024-02-19T08:59:10+5:30

Sensex च्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचं मार्केट कॅप ७१,४१४ कोटी रुपयांनी घसरलंय.

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचं मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकूण 71,414.03 कोटी रुपयांनी घसरलं आहे. एलआयसी व्यतिरिक्त, टॉप 10 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार मूल्यांकनातही घसरण झाली. एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये 26,217.12 कोटी रुपयांची घसरण झाली.

दुसरीकडे, एसबीआय, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचं मार्केट कॅप मात्र वाढलं. या कंपन्यांच्या मूल्यांकनात एकत्रितपणे 62,038.86 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात एलआयसीचं मार्केट कॅप 26,217.12 कोटी रुपयांनी घसरून 6,57,420.26 कोटी रुपयांवर आलं.

त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS चं बाजारमूल्य 18,762.61 कोटी रुपयांनी घसरून 14,93,980.70 कोटी रुपयांवर आलं. आयटीसीचं मार्केट कॅप 13,539.84 कोटी रुपयांनी घसरून 5,05,092.18 कोटी रुपये झालं. तर हिंदुस्थान युनिलिव्हरचं बाजारमूल्य 11,548.24 कोटी रुपयांनी घसरून 5,58,039.67 कोटी रुपयांवर आलं.

गेल्या आठवड्यात भारती एअरटेलचं मार्केट कॅप 703.60 कोटी रुपयांनी घसरून 6,30,340.9 कोटी रुपये राहिलं. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 642.62 कोटी रुपयांनी घसरून 19,76,493.92 कोटी रुपये झालं.

दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज बुधवारी 20 लाख कोटी रुपयांचं बाजारमूल्य पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. याआधी मंगळवारीही रिलायन्सचं मूल्यांकन 20 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचलं होतं. मात्र, दिवसअखेर ते 19.93 लाख कोटी रुपयांवर आलं.

तर दुसरीकडे एसबीआयचं बाजारमूल्य 27,220.07 कोटी रुपयांनी वाढून 6,73,585.09 कोटी रुपयांवर पोहोचलं. इन्फोसिसच्या मूल्यांकनात 13,592.73 कोटी रुपयांची भर पडली आणि तिचे मूल्यांकन 7,06,573.08 कोटी रुपयांवर पोहोचलं. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 12,684.58 कोटी रुपयांनी वाढून 10,78,493.29 कोटी रुपये आणि आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 8,541.48 कोटी रुपयांनी वाढून 7,17,796.25 कोटी रुपयांवर पोहोचलं.

सर्वात मौल्यवान टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, एलआयसी, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक येतो.