5वी नापास, वयाच्या तेराव्या वर्षी 12 रुपयांनी सुरुवात अन् आज तब्बल 12 हजार कोटींचीं संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:40 PM2023-08-17T13:40:08+5:302023-08-17T13:43:48+5:30

हा प्रसिद्ध उद्योगपती दिवाळी बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना घर, मर्सिडीज कार भेट देतो.

Savji Dhanji Dholakia : तुम्ही आतापर्यंत अनेक अब्जाधीशांच्या यशोगाथा ऐकल्या असतील. आज आम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत, ज्यांची गणना देशातील मोठ्या उद्योगपतींमध्ये होते. अतिशय गरिबीत जगणाऱ्या या व्यक्तीने केवळ 12 रुपयांपासून व्यवसायाची सुरुवात केली आणि आज अब्जावधींचे साम्राज्य उभे केले आहे. त्यांची कहाणी आश्चर्यकारक, अविश्वसनीय, अकल्पनीय आहे...शून्यातून शिखरावर पोहोचणाऱ्या व्यक्तीचे नाव सावजीभाई ढोलकिया आहे.

सावजीभाई हे गुजरातच्या मरेली जिल्ह्यातील दुधाला गावचे रहिवासी. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सावजीभाईंनी 1977 मध्ये फक्त 12.5 रुपये घेऊन सुरत गाठले. हे पैसे बसचे भाडे भरण्यात खर्च झाले. पण, एखादी मोठी गोष्ट करण्याची मनात इच्छा असेल, तर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. सावजीभाईंनी हे सत्यात उतरवलं. आज सावजीभाईंची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 12.5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

आज डायमंड सिटी सुरत येथील हिरे व्यापारी सावजीभाई यांचा व्यवसाय इतका मोठा आहे की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून, घर, कार आणि मोपेड भेट देतात. त्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कारही भेट दिली आहे. अतिशय नम्र आणि परोपकाराचे असलेल्या सावजीभाईंना दिलदार बॉस या नावानेही ओळखले जाते. दर दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना भव्य दिवाळी बोनस देण्यासाठी ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत.

सावजीभाई यांनी आर्थिक अडचणींमुळे वयाच्या 13 व्या वर्षी शिक्षण सोडले. 1977 मध्ये सावजी आपल्या गावातून साडेबारा रुपये घेऊन सुरत येथे मामाच्या घरी पोहोचले. तिथ त्यांनी हळुहळू हिऱ्यांच्या व्यापारातील बारकावे शिकून घेतले. नंतर सूरतमधील एका कारखान्यात 179 रुपये प्रति महिना पगारावर नोकरी केली. त्यावेळी खाण्यापिण्यावर 140 रुपये खर्च करून ते 39 रुपये वाचवत असत. यादरम्यान त्यांनी मित्राकडून हिरे ग्रायंडिंगचे काम शिकले. 10 वर्षे नोकरी केल्यानंतर हळुहळू हा व्यवसाय सुरू केला.

1984 मध्ये त्यांनी त्यांचे भाऊ हिम्मत आणि तुलसी यांच्यासोबत हरी कृष्ण एक्सपोर्टर्स नावाची वेगळी कंपनी सुरू केली. ही कंपनी डायमंड आणि टेक्सटाईल विभागात काम करते. ज्या कंपनीत ते काम करायचे, आज त्याच कंपनीचे मालक झाले आहेत. त्यांच्या हिरे आणि कापड उद्योगात 6000 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांची कंपनी गुणवत्तेसाठी तसेच पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध आहे.

हरे कृष्ण डायमंड कंपनीने 25 वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या 3 व्यवस्थापकांना 1.1 कोटी रुपयांच्या मर्सिडीज कार भेट दिल्या होत्या. एवढेच नाही तर 8 वर्षे काम केल्यानंतर दिलीप नावाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सावजी ढोलकिया यांनी त्यांच्या पत्नीला एक कोटी रुपयांचा धनादेशही दिला होता. सावजी ढोलकिया याआधीही अशा प्रकारचे बोनस देऊन चर्चेत आले आहेत.