सॅमसंगमुळे चांदी महागली? ९ मिनिटांत चार्ज होणाऱ्या बॅटरीचं आणि दरवाढीचे कनेक्शन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:05 IST2025-12-30T17:55:50+5:302025-12-30T18:05:45+5:30
सध्या बाजारात चांदीच्या वाढलेल्या दराची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्याच्याकडे चांदी आहे, त्याची खरोखरच चांदी सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पण, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. चांदीच्या या तुटवड्याला आणि वाढत्या किमतीला टेक जगतातील दिग्गज कंपनी सॅमसंग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावरील रील करणाऱ्यांच्या मते, सॅमसंग आता Solid-State Batteries बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दावा असा आहे की, ही बॅटरी एका चार्जवर ९०० किलोमीटर चालेल. फुल चार्ज होण्यासाठी फक्त ९ मिनिटे लागतील. सर्वात धक्कादायक दावा म्हणजे, एक बॅटरी बनवण्यासाठी चक्क १ किलो चांदी लागेल!

असे दिलेले दावे ऐकायला रंजक वाटत असले तरी वास्तवाशी त्यांचा संबंध नाही. सॅमसंग सॉलिड-स्टेट बॅटरीवर काम करत आहे हे खरे आहे, पण ती अजूनही चाचणीच्या टप्प्यावर आहे. तिची नेमकी रेंज आणि चार्जिंग वेळ अजून अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही.

जर एका बॅटरीला १ किलो चांदी लागली, तर फक्त चांदीची किंमतच जवळपास १ लाख रुपये होईल. यामुळे ईव्ही गाड्या इतक्या महाग होतील की त्या कोणालाही परवडणार नाहीत. तज्ज्ञांच्या मते, जर तंत्रज्ञान यशस्वी झाले तरी एका बॅटरीसाठी २०० ग्रॅमपेक्षा जास्त चांदी लागणार नाही.

सॅमसंगने मेक्सिकोच्या 'सिल्व्हर स्टॉर्म' कंपनीशी भागीदारी केली आहे, कारण मेक्सिको जगात २४% चांदी उत्पादन करतो. सॅमसंग भविष्यातील गरज ओळखून गुंतवणूक करत आहे, याचा अर्थ असा नाही की ते आजच सर्व चांदी स्वतःकडे घेत आहेत.

चांदीच्या दरवाढीमागे सॅमसंग नसून मागणी आणि पुरवठा हे मुख्य गणित आहे. गेल्या ५ वर्षांपासून चांदीचा पुरवठा कमी आणि मागणी प्रचंड आहे. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, मेडिकल उपकरणे आणि ५जी तंत्रज्ञान यामध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. चांदीला स्वस्त पर्याय नसल्यामुळे उद्योगांना ती खरेदी करावीच लागते.

चीनने जाहीर केले आहे की, १ जानेवारी २०२६ पासून चांदीच्या निर्यातीसाठी सरकारी लायसन्स अनिवार्य असेल. चीन जगातील १३% चांदी उत्पादन करतो. या निर्बंधांमुळे चांदीचा जागतिक पुरवठा आणखी विस्कळीत होण्याची भीती आहे, ज्यावर एलॉन मस्क यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

















