स्कूटरवर नमकीन-बिस्कीट विकणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय, पण ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 08:46 AM2023-11-15T08:46:12+5:302023-11-15T09:04:23+5:30

आयपीओसाठी अर्ज केल्यानंतर सेबीने सहाराला गुंतवणूकदारांची कागदपत्रे मागितली तेव्हा त्यांनी कागदपत्रांचे १२७ ट्रक पाठवले होते.

देशातील प्रमुख उद्योग समुहांपैकी एक असलेल्या सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सहारा परिवाराचे प्रमुख असलेले सुब्रतो रॉय हे बऱ्याच दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुब्रतो रॉय (Subrata Roy) यांनी स्कूटरवर नमकीन विकून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एकेकाळी, सहारा समूहाचा व्यवसाय रिअल इस्टेट, फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया, मनोरंजन, आरोग्य सेवा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, माहिती तंत्रज्ञान आणि एअरलाइन क्षेत्रांपर्यंत विस्तारला होता. त्यानंतर एक वेळ अशी आली की त्यांना तुरुंगात जावं लागलं.

बिहारच्या अररिया जिल्ह्यात राहणाऱ्या सुब्रतो रॉय यांचं अभ्यासात कधीच मन लागलं नाही. त्यांचं सुरूवातीचं शिक्षण कोलकात्यात गेलं आणि त्यानंतर ते गोरखपुरला आलेय १९७८ मध्ये त्यांनी आपल्या मित्रासोबत मिळून स्कूटरवर बिस्किटं आणि नमकिन विकण्यास सुरुवात केली.

एका खोलीत दोन खुर्च्या आणि एका स्कूटरच्या माध्यमातून त्यांनी २ लाख कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास केला. त्यांनी मित्रासोबत मिळून एक चिटफंड कंपनी सुरू केली. त्यांनी पॅरा बँकिंगची सुरूवात केली. त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांना टार्गेट केलं. केवळ १०० रुपये कमावणारेही त्यांच्याकडे २० रुपये जमा करत होते.

त्यांची ही स्कीम देशातील प्रत्येक गल्लीबोळात प्रसिद्ध झाली. लाखो लोक सहारामध्ये सामील होऊ लागले. मात्र, १९८० मध्ये सरकारने या योजनेवर बंदी घातली. हा तो काळ होता जेव्हा सुब्रतो रॉय सहारा यांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर एकामागून एक सेक्टरमध्ये त्यांनी पंख पसरवण्यास सुरुवात केली.

रिअल इस्टेट, फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया, मनोरंजन, आरोग्य सेवा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहारा समूह पसरला होता. सहाराचा आवाज देशातच नाही तर जगभर ऐकू येत होता. सहारा समूह ११ वर्षे टीम इंडियाचा स्पॉन्सर होता. जसजसा सहाराचा व्यवसाय वाढला तसतशी सुब्रतो रॉय यांची संपत्ती दुप्पट, चारपट झाली.

सहारा आपल्या लाईफस्टाईल, लक्झरीसाठी प्रसिद्ध होत होते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये त्यांची ४४०० कोटींची दोन आलीशान हॉटेल्सही आहे. अॅम्बिव्हॅलीमध्ये ३१३ एकरची डेव्हलमेंट साईट, लखनौतील गोमतीनगरमध्ये १७० एकर जमिनीवर त्यांनी आपलं पूर्ण शहर वसवलं. देशातील निरनिराळ्या भागात त्यांच्याकडे ७६४ एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या मुलांच्या विवाहासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचं म्हटलं जातं. अनेक प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या मुलांच्या लग्नकार्यासाठी पोहोचल्या होत्या.

टाईम्स मॅगझीननं सहाराला रेल्वेनंतर दुसरी सर्वात मोठी नोकरी देणारी कंपनी म्हटलं होतं. ११ लाखांपेक्षा अधिक लोक त्यांच्या समूहाचा भाग होते. परंतु नंतर त्यांचं नशीब फिरलं आणि सुब्रतो रॉय यांना तुरुंगाची हवा खावी लागली. २००९ मध्ये त्यांची आयपीओ आणण्याची योजना होती. सहारानं आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला तेव्हा सेबीनं त्यांच्याकडे डीआरएचपी म्हणजेच कंपनीची पूर्ण माहिती मागितली.

२००९ मध्ये सहारानं सहारा इंडिया रियल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा आयपीओ आणण्याचा प्रस्ताव सेबीसमोर ठेवला. सेबीला सहाराच्या दस्तऐवजांमध्ये गैरव्यवहार दिसून आले. सहारानं त्यांच्या गुंतवणूकदारांचा पैसा चुकीच्या पद्धतीनं वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. कंपनी शेअर बाजारात लिस्टेड नसतानाही सहारानं आपल्या दोन्ही कंपन्यांच्या ३ कोटी गुंतवणूकदारांकडून २४००० कोटी रुपये जमवले असा आरोप सेबीनं केला. नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी त्यांच्यावर १२००० कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

जेव्हा सेबीने सहाराला गुंतवणूकदारांचे तपशील आणि कागदपत्रे मागितली तेव्हा सहाराने कागदपत्रांचे १२७ ट्रक पाठवले होते. या ट्रक्समुळे मुंबईच्या बाहेरील भागात वाहतूक कोंडी झाली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. जिथे सुब्रतो रॉय यांच्या वतीने प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुब्रतो रॉय यांना वाचवण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही.

सुब्रतो रॉय यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका कठोर राहिली. सहाराला १५ टक्के व्याजासह २४००० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सुब्रतो रॉय यांना फेब्रुवारी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर ते पॅरोलवर बाहेर आले होते.