अफगाणिस्तानातील 'अंबानी'! शरणार्थी ते अब्जाधीश होण्याचा प्रवास; कोण आहेत मीरवाइज अजीजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:21 IST2025-10-14T13:15:46+5:302025-10-14T13:21:38+5:30
Richest People in Afghanistan: अफगाण-सोव्हिएत युद्धाच्या काळात देश सोडला; शरणार्थी म्हणून राहिले अन् आज ₹1 लाख कोटींचे साम्राज्य..!

Richest People in Afghanistan: दीर्घकाळापासून राजकीय अस्थिरता, प्रचंड बेरोजगारी आणि अस्थिर व्यावसायिक वातावरणाने ग्रासलेल्या अफगाणिस्तानातून एका व्यक्तीची प्रेरणादायी कथा चर्चेत आली आहे. मीरवाइज अजीजी, असे या व्यक्तीचे नाव असून, यांना अफगाणिस्तानमधील 'अंबानी' म्हटले तर वावगे ठरणार नाही. कधीकाळी युद्धग्रस्त देशातून शरणार्थी म्हणून बाहेर पडलेले हे अफगाण उद्योजक आज संयुक्त अरब अमीरातमधील (UAE) सर्वात प्रभावशाली रिअल इस्टेट डेव्हलपरपैकी एक मानले जातात.
मीरवाइज अजीजी (mirwais azizi) यांनी आपला संघर्षमय प्रवास 1988 मध्ये अफगाण-सोव्हिएत युद्धाच्या काळात सुरू केला. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी देश सोडला आणि दुबई गाठले. काही काळ दुबईत शरणार्थी म्हणून राहिल्यानंतर त्यांनी ‘अजीजी ग्रुप’ची स्थापना केली आणि हीच त्यांच्या यशाची पायाभरणी ठरली.
सुरुवातीला अजीजी उझबेकिस्तानला गेले आणि तिथे कपड्यांच्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी बुल्गारियातील तंबाखू उद्योगात गुंतवणूक केली आणि हळूहळू रशियन राष्ट्रकुल देशांमध्ये व्यापार विस्तारला. अखेरीस UAE मध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तेल आणि वायू उद्योगावर लक्ष केंद्रित केले.
व्यवसायातील यशानंतर मीरवाइज अजीजी यांनी ‘अजीजी बँक’ स्थापन केली, जी पुढे जाऊन अफगाणिस्तानातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह व्यावसायिक बँक ठरली. त्यानंतर त्यांच्या समूहाने ‘अल बख्तर बँक’ या जलदगतीने वाढणाऱ्या वित्तीय संस्थेचे अधिग्रहण केले. 2007 मध्ये ‘अजीजी डेव्हलपमेंट्स’ या रिअल इस्टेट कंपनीची स्थापना करुन त्यांनी दुबईच्या मालमत्ता बाजारात प्रवेश केला. 2008 मध्ये त्यांनी ‘ऑफ-प्लॅन प्रॉपर्टीज’ची विक्री सुरू केली.
आज मीरवाइज अजीजींच्या नेतृत्वाखाली अजीजी ग्रुपचा पोर्टफोलिओ तब्बल 12 अब्ज अमेरिकी डॉलरचा (सुमारे ₹1 लाख कोटी) असून, 200 हून अधिक प्रकल्प UAE मध्ये सुरू आहेत. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर अंदाजे ₹3,400 कोटींहून अधिक आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपला प्रवास फक्त $700 (सुमारे ₹58,000) पासून सुरू केला होता आणि आज ते मध्यपूर्वेतील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत.
संपत्ती आणि यश मिळवूनही मीरवाइज अजीजी यांनी आपल्या मूळ देशाला विसरले नाही. त्यांनी अफगाणिस्तानात सुमारे 5,000 रोजगार निर्माण केले असून, देशाच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्निर्माणातही सक्रिय योगदान दिले आहे. मीरवाइज अजीजींची कहाणी ही फक्त आर्थिक यशाची नाही, तर संघर्षातून उभे राहण्याच्या अदम्य इच्छाशक्तीची प्रतीक आहे. युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या देशातून आलेल्या व्यक्तीने एवढे मोठे सामार्ज उभे करणे लहान गोष्ट नाही.