RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात वाढ, पाहा किती वाढणार तुमचा EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 11:22 AM2022-09-30T11:22:56+5:302022-09-30T11:33:51+5:30

RBI Repo Rate : अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सनं वाढ केल्याची घोषणा केली. याचा परिणाम तुमच्या ईएमआयवरही होणार आहे.

RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक आज संपन्न झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देत ​​रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती.

पतधोरण समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला सहमती दिल्याची माहिती दास यांनी दिली. तसंच रिझर्व्ह बँकेनं Accommodative Policy मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.

व्याजदर वाढल्याने बँकांकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. यामुळे घर, कार यासह सर्व कर्जावरील तुमचा EMI वाढेल. कर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी बँका रेपो दराचा बेंचमार्क म्हणून वापर करतात. त्यामुळे रेपो दरात वाढ झाली की कर्जाचा व्याजदर वाढतो. रेपो दर कमी झाला की कर्जाचा व्याजदर कमी होतो.

आरबीआयच्या रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे. ज्यांनी फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा EMI वाढेल. कार, ​​वैयक्तिक कर्जासह इतर प्रकारची कर्जे घेणेही महाग होणार आहे. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

समजा एखाद्या व्यक्तीने 50 लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. या कर्जाची मुदत 20 वर्षे आहे. यापूर्वी या कर्जाचा व्याजदर 8.12 टक्के होता. आता रेपो दर वाढल्याने ते 8.62 टक्के होईल. यामुळे कर्जाचा कालावधी 2 वर्षे 3 महिन्यांनी वाढेल. यामुळे त्याला व्याज म्हणून अतिरिक्त 11 लाख रुपये द्यावे लागतील. तुमच्या EMI ची रक्कम तेवढीच राहिल तेव्हा हे लागू होईल.

तुमच्यापुढे दुसरा पर्याय म्हणजे EMI वाढवून कर्जाचा कालावधी तेवढाच ठेवणे. हे उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. यापूर्वी या कर्जाचा व्याजदर 8.12 टक्के होता. आतापर्यंत त्याचा ईएमआय 42,196 रुपये होता. रेपो दरात 0.50 टक्के वाढ झाल्यानंतर कर्जाचा व्याजदर 8.62 टक्के होईल. यामुळे ईएमआय 43,771 रुपये होईल. अशाप्रकारे त्याचा ईएमआय दरमहा 967 रुपयांनी वाढेल.

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. आजच्या वाढीसह, रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

या वाढीपूर्वी रेपो दर 5.40 टक्के होता. कोरोना विषाणूची महासाथ आणि रशिया युक्रेन युद्धानंतर निरनिराळ्या देशांच्या केंद्रीय बँकांच्या आक्रमक आर्थिक धोरणांमुळे आणखी एक वादळ उठलं असल्याचं मत दास यांनी यावेळी व्यक्त केलं.