New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 09:28 IST2025-02-25T09:14:55+5:302025-02-25T09:28:41+5:30
New India Co-Operative Bank News : काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यावसायिक कामकाजावर बंदी घातली होती. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना दिलासा दिलाय.

New India Co-Operative Bank News : काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यावसायिक कामकाजावर बंदी घातली होती. याअंतर्गत बँक ना नवीन कर्ज देऊ शकणार आहे, ना कोणत्या ठेवी स्वीकारू शकणार आहे. लोकांना ही पैसे काढता येत नव्हते. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना दिलासा दिलाय. रिझर्व्ह बँकेनं खातेदारांना २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर बंदी घातल्यानंतर बँकेच्या खातेदारांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. रिझर्व्ह बॅंकेनं ठेवीदारांच्या पैसे काढण्यावरही बंदी घातली होती, ती आता एका मर्यादेपर्यंत काढून टाकण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेनं नुकतीच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासक आणि सल्लागारांची समिती नेमली होती. त्यांच्याकडून बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं खातेदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत २७ फेब्रुवारी २०२५ पासून प्रत्येक खातेदाराला २५,००० रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या सवलतीनंतर बँकेच्या एकूण भागधारकांपैकी सुमारे ५० टक्के म्हणजेच निम्म्या लोकांना आपली संपूर्ण शिल्लक रक्कम काढता येणार आहे. तर उर्वरित निम्म्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
पैसे काढण्यासाठी खातेदार बँकेच्या शाखेत जाऊ शकतात किंवा पैसे काढण्यासाठी बँकेच्या एटीएम चॅनेलचा वापर करू शकतात. मात्र, एकूण रक्कम २५,००० रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या खात्याची एकूण रक्कम, यापैकी जी कमी असेल ती काढता येईल, असंही आरबीआयनं स्पष्ट केलंय.
रिझर्व्ह बँकेनंही काही काळापूर्वी पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. बँकेच्या ९० टक्क्यांहून अधिक ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत.
डीआयसीजीसीच्या नियम १८ अ नुसार ग्राहकांना पैसे दिले जातील. खातेदारांनी ४५ दिवसांच्या आत (३० मार्च २०२५ पर्यंत) दाव्याशी संबंधित सर्व कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. बँक खात्याशी संबंधित सर्व प्रमाणपत्रे, पर्यायी बँक खाते क्रमांक आणि त्याची माहिती ग्राहकांना द्यावी लागेल. यामुळे थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतील.