उडवली खिल्ली, ७ मुलाखतींत रिजेक्शन; आत्महत्येचे विचार आले; आता बनल्या यंगेस्ट CEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:20 AM2023-11-08T09:20:54+5:302023-11-08T09:32:09+5:30

एडलवाईस एमएफच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी आज स्वत:ला सिद्ध केलं आहे.

अनेकदा लोक एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरून खिल्ली उडवताना दिसतात. शरीरयष्टी पाहून ते त्याची चेष्टा करू लागतात. शारीरिक समस्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात, परंतु मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली तर यशापासून कोणालाही रोखू शकत नाहीत. एडलवाईस एमएफच्या सीईओ राधिका गुप्ता (Edelweiss MF CEO Radhika Gupta) यांनी हे स्वत:ला सिद्ध केलं आहे.

त्यांच्या मानेचा त्रास आणि भारतीय असण्याची खूप खिल्ली उडवली गेली. शाळेत, राधिका त्यांच्या मानेमुळे आणि भारतीय उच्चारामुळे मुलांमध्ये हसण्याचा विषय बनल्या. शाळेत त्यांना अनेकदा खूप त्रास दिला गेला, पण राधिका यांनी हार मानली नाही.

कॉलेजमध्ये गेल्यावरही अडचणींनी त्यांची साथ सोडली नाही. परंतु मुलाखतीत ७ वेळा रिजेक्ट झाल्यानंतर त्यांचा धीर सुटला. वयाच्या २२ व्या वर्षी आत्महत्येचा विचार करणाऱ्या राधिका यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी कोट्यवधींच्या कंपनीच्या सीईओ बनल्या. आज आपण राधिका गुप्ता यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. सध्या त्यांच्या नावाची चर्चा होत आहे कारण त्या लवकरच शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनमध्ये शार्कच्या भूमिकेत दिसणार आहे. राधिका त्यांच्या स्टार्टअप्सचा अनुभव शेअर करणार आहेत.

राधिका गुप्ता यांचे वडील डिप्लोमॅट होते, त्यामुळे त्यांचं बालपण अनेक देशांमध्ये गेलं. ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राधिका यांनी आजवरच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. त्यांचे वडील डिप्लोमॅट होते, त्यामुळे त्यांनी भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नायजेरियामध्ये शिक्षण घेतलं.

राधिका गुप्ता यांचे वडील डिप्लोमॅट होते, त्यामुळे त्यांचं बालपण अनेक देशांमध्ये गेलं. ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राधिका यांनी आजवरच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. त्यांचे वडील डिप्लोमॅट होते, त्यामुळे त्यांनी भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नायजेरियामध्ये शिक्षण घेतलं.

नायजेरियातील शाळेत, त्याच्या मानेमुळे आणि भारतीय उच्चारांमुळे त्यांचे वर्गमित्र त्याची चेष्टा करायचे. कार्टून कॅरेक्टर अप्पू या नावानं राधिका यांची खिल्ली उडवली जायची. राधिका यांची तुलना त्याच शाळेत शिकवणाऱ्या त्यांच्या आईसोबतही करण्यात आली.

राधिका गुप्ता जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा मानेमुळे अनेक जण त्यांची खिल्ली उडवत होते. पण तरीही त्यांनी हे सगळं सहन केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या नोकरीच्या मुलाखतीसाठी गेल्या तेव्हा तिला त्यांना अनेकदा रिजेक्शन मिळालं. सलग सात वेळा त्यांना मुलाखीतीनंतर नाकारण्यात आलं. यानंतर राधिका स्वतःला अपयशी समजू लागल्या.

अशावेळी आत्महत्येचा विचारही त्याच्या मनात आला. त्या एकदा खिडकीतून उडी मारणार होत्या तेव्हा तिच्या मित्रांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवलं. २२ वर्षांच्या राधिका डिप्रेशनमध्ये गेल्या. त्याच्या उपचारासाठी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखल करावं लागलं. जेव्हा त्यांना मॅकेन्झीमध्ये नोकरी मिळाली त्यानंतर त्यांना तिकडून सुट्टी देण्यात आली.

पहिली नोकरी मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास परत येऊ लागला. त्यानंतर राधिका भारतात परतल्या. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी पती आणि मित्रासोबत स्वतःची असेट्स मॅनेजमेंट फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली, जी नंतर एडलवाईस एमएफनं विकत घेतली. एडलवाईसनं राधिका यांची सीईओ म्हणून निवड केली. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी राधिका सर्वात तरुण सीईओ बनल्या.

राधिका गुप्ता यांनी कोणत्याही कमतरतेला आपल्या क्षमतेवर भारी पडू दिलं नाही. त्यांच्या दिसण्यावरुन खिल्ली उडवणाऱ्या लोकांनाही त्यांनी उत्तर दिलं. आपल्यात या कोणत्याही कमतरता नसून ती आपली खासियत असल्याचं त्या सांगतात. आता राधिका शार्क टँक इंडिया या स्टार्टअप रिअॅलिटी शोच्या सीझन ३ मध्ये जज म्हणून दिसणार आहेत.