₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:26 IST2025-05-13T10:13:29+5:302025-05-13T10:26:02+5:30
Donald Trump Gift: अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. जगभरातील देश त्याच्या राष्ट्राध्यक्षांना महागड्या भेटवस्तू देत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महागडी भेट मिळणार आहे.

Donald Trump Gift: अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. जगभरातील देश त्याच्या राष्ट्राध्यक्षांना महागड्या भेटवस्तू देत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महागडी भेट मिळणार आहे. आखाती देश कतारचं राजघराणं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फ्लाइंग पॅलेस बोईंग ७४७-८ जम्बो जेट भेट देणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प याचा वापर एअर फोर्स वन (Air Force One) म्हणून करतील. हे आलिशान विमान अमेरिकन सरकारला मिळणाऱ्या सर्वात महागड्या भेटवस्तूंपैकी एक असेल. याची किंमत जवळपास ४०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३३,९२,९१,६०,००० रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानावर बराच पैसा खर्च करण्यात आला आहे. यात वक्राकार जिने, आलिशान गालिचे आणि चामड्याचे सोफे आहेत. ट्रम्प या आठवड्यात कतारला जाणार असून या दरम्यान त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर उभ्या असलेल्या या विमानाला ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात भेट दिली होती.
याला फ्लाइंग पॅलेस म्हणतात. या विमानाचे इंटिरिअर प्रसिद्ध फ्रेंच इंटिरिअर डिझाइन फर्म अल्बर्टो पिंटो कॅबिनेटनं केलं आहे. यात सोन्याच्या रंगाच्या वापर आणि सोन्याच फर्निचर आहे, जे डोनाल्ट ट्रम्प याच्या आलिशान ट्रम्प टॉवरच्या घराची आठवण करून देते.
हे जगातील सर्वात आलिशान प्रायव्हेट जेट म्हटलं जात आहे. या विमानात अल्ट्रा लक्झरी इंटिरिअर देण्यात आलंय आहे. यात प्रशस्त मास्टर बेडरूम, ६-७ जणांच्या बसण्याचा कॉन्फरन्स एरिया, अनेक लाऊंज आणि अनेक बाथरूम आहेत. या जेटमध्ये दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिनाही आहे.
एअर फोर्स वन म्हणून वापरण्यासाठी लक्झरी जेट स्वीकारण्याच्या कतारच्या राजघराण्याच्या निर्णयाचा ट्रम्प यांनी बचाव केला आहे. त्यांनी याचं वर्णन 'मोफत भेट' असं करत जो इतकी महागडी भेट स्वीकारणार नाही तो मुर्खच असेल असं म्हटलं. ट्रम्प यांनी लिहिलं की, संरक्षण खात्याला ४० वर्षे जुन्या एअर फोर्स वनची तात्पुरती जागा घेणारं ७४७ विमान विनामूल्य मिळत आहे. हे विमान ट्रम्प यांना वैयक्तिक भेट असल्याचं कतारनं नाकारलं आहे. त्यांनी याला सरकार ते सरकार हस्तांतरण असं म्हटलंय.
कतारचं राजघराणं जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, या कुटुंबाची नेटवर्थ ३३५ अब्ज डॉलर आहे. कतारवर १९ व्या शतकाच्या मध्यापासून थानी राजघराण्याची सत्ता आहे. त्याचे विद्यमान अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी २०१३ मध्ये गादीवर विराजमान झाले. या कुटुंबानं अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये लंडनमधील शार्ड स्कायस्क्रॅपर, ऑलिंपिक व्हिलेज आणि हॅरॉडच्या डिपार्टमेंटल स्टोअरचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंग, बार्कलेज, ब्रिटिश एअरवेज आणि फोक्सवॅगनमध्येही कुटुंबाची गुंतवणूक आहे.