घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! विक्रीत ४ टक्क्यांची वाढ; देशातील कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:41 IST2025-02-12T14:37:40+5:302025-02-12T14:41:50+5:30

Property News : तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुम्हाला वास्तवाची जाणीव करुन देणार आहे. कारण, गेल्या वर्षी घरांच्या विक्रीत ४ टक्के वाढ झाली आहे.

गावाकडून शहरात आलेल्या प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न असते. तुमच्याही मनात असाच विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतातल्या १५ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत ४ टक्के वाढ झाली आहे. एखाद्या ठिकाणी मागणी वाढणे म्हणजे घरांच्या किमती वाढणार असल्याचे संकेत असतात.

साल २०२४ मध्ये १,७८,७७१ घरांची विक्री झाली असून किंमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईवर लिस्टेड रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म प्रोपइक्विटीने बुधवारी दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

डेटानुसार, २०२३ मध्ये १,७१,९०३ युनिट्सची विक्री झाली होती. तर विक्री किंमत १,२७,५०५ कोटी रुपये होती. या १५ शहरांमध्ये अहमदाबाद, सुरत, वडोदरा, गांधीनगर, नाशिक, जयपूर, नागपूर, भुवनेश्वर, मोहाली, विशाखापट्टणम, लखनौ, कोईम्बतूर, गोवा, भोपाळ आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश आहे.

2024 मध्ये, कोईम्बतूरमध्ये घरांच्या विक्रीत सर्वाधिक ३६ टक्के वाढ झाली, तर विशाखापट्टणममध्ये सर्वाधिक २१ टक्के घट नोंदवली गेली. भुवनेश्वरमध्ये विक्रीच्या किमतीत सर्वाधिक ४७ टक्के वाढ झाली, तर नाशिकमध्ये विक्री किंमत २ टक्क्यांनी घसरली.

गुजरातमधील सुरतमध्ये घरांच्या विक्रीत १५ टक्के, गांधी नगरमध्ये ८ टक्के, गोव्यात ५ टक्के, अहमदाबादमध्ये ४ टक्के आणि नागपुरात ३ टक्के वाढ झाली आहे.

जयपूरमध्ये घरांच्या विक्रीत ५ टक्के आणि लखनऊमध्ये १ टक्क्यांनी वाढ झाली, तर मोहालीमध्ये १ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. जयपूरमध्ये ३९ टक्के, लखनऊमध्ये ५ टक्के आणि मोहालीमध्ये १८ टक्के विक्रीची किंमत वाढली आहे.

घरांच्या विक्रीत भुवनेश्वरमध्ये २३ टक्के आणि भोपाळमध्ये १० टक्के वाढ झाली आहे, तर विक्रीच्या किमती भोपाळमध्ये ३८ टक्के आणि भुवनेश्वरमध्ये ४७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.