दर महिन्याला कमाई करवणारी 'ही' स्कीम आहे जबरदस्त; केवळ ₹१००० पासूनही सुरू करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 08:47 AM2024-03-15T08:47:08+5:302024-03-15T08:56:13+5:30

याद्वारे तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक फक्त १००० रुपयांपासून सुरू करता येते.

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक लघु बचत योजना आहेत ज्या अतिशय आकर्षक आहेत. अशीच एक गुंतवणूक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. याद्वारे तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक फक्त १००० रुपयांपासून सुरू करता येते.

परंतु या योजनेच्या काही नियम आणि अटी आहेत, ज्यांचं गुंतवणूकदारांना पालन करावं लागतं. या योजनेंतर्गत खातं उघडणं आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी अतिशय सोप्या आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडण्यासाठी अर्ज करू शकता.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील खातं कोणत्याही एका प्रौढ व्यक्तीद्वारे उघडता येतं. याशिवाय तीन जणही संयुक्त खातं उघडू शकतात. इतकंच नाही तर जर अल्पवयीन व्यक्ती १० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्यांच्या नावे खातं उघडून त्यात गुंतवणूक करता येते. तसेच, एक पालक देखील अल्पवयीन मुलांच्या वतीनं खातं उघडण्यासाठी अर्ज करू शकतात.

या योजनेमध्ये तुम्ही किमान १००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि १००० च्या पटीत गुंतवणूक करू शकता. पण गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा देखील आहे. एकल खातेदार जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकतात. जर तुमचं संयुक्त खातं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करू शकता. संयुक्त खात्यात सर्व संयुक्त धारकांचा समान हिस्सा असेल. पालक म्हणून अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडलेल्या खात्याची मर्यादा वेगळी असेल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यांतर्गत जमा केलेल्या रकमेवर सध्या ७.४ टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे. खातं उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर व्याज दिलं जातं. ही प्रक्रिया मॅच्युरिटीपर्यंत चालू राहते. दरमहा देय असलेल्या व्याजावर खातेदारानं दावा केला नाही, तर अशा व्याजावर कोणतंही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

दरम्यान, खातेधारकाकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम जमा केली तर परत केली जाईल. खातं उघडल्याच्या तारखेपासून पैसे काढल्याच्या तारखेपर्यंत फक्त पोस्ट ऑफिस बचत खात्यावर व्याज लागू होईल. पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याच पोस्ट ऑफिस किंवा बचत खात्यात ऑटो क्रेडिटद्वारे व्याज काढलं जाऊ शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर कर लागू होतो.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, खातं उघडल्याच्या तारखेपासून ५ वर्षे पूर्ण झाल्यावर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज सादर करून खातं बंद केलं जाऊ शकतं. मॅच्युरिटी कालावधीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खातं बंद केले जाऊ शकते आणि रक्कम नॉमिनीला/कायदेशीर वारसांना परत केली जाऊ शकते.

तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कोणतीही डिपॉझिट केलेली रक्कम काढू शकत नाही. खातं सुरू केल्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी बंद केल्यास, मूळ रकमेच्या २ टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल.