PM Kisan : सरकारने बदलले नियम, आता 'या' डॉक्युमेंट्सशिवाय मिळणार नाहीत पैसे; लगेच करा अपडेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:02 PM2022-01-18T14:02:14+5:302022-01-18T14:14:03+5:30

PM Kisan : या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक (Ration Card Mandatory) असेल.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक (Ration Card Mandatory) असेल.

याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय पीडीएफ (PDF) देखील अपलोड करावी लागणार आहे.

आता खतौनी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. सरकारकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येते.

तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली जाते.

पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.

शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल आणि होम पेजवर फार्मर कॉर्नरवर जावे लागेल.

फार्मर कॉर्नरमध्ये लाभार्थी लिस्टच्या लिंकवर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण यादी येईल.