खूशखबर! PF ची रक्कम 3 दिवसांऐवजी केवळ 1 तासात जमा होणार; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 10:35 IST2021-09-21T10:25:30+5:302021-09-21T10:35:07+5:30
EPFO : कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) दिली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात नागरिकांना भासणारी पैशांची गरज लक्षात घेत केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीबाबत नवीन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) 1 लाख रुपये अॅडव्हान्स काढू शकता. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन काळात तुम्ही हे पैसे काढू शकता.

याचबरोबर, अॅडव्हान्स पैशांसाठी अर्ज केल्यानंतर बँक खात्यात हस्तांतरण (DBT)करण्याची वेळ देखील कमी केली गेली आहे. यासाठी सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यापूर्वीदेखील अशी रक्कम काढता येत होती, मात्र हीच प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत होणार आहे.

कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) दिली आहे. कोरोना विषाणू व्यतिरिक्त इतर कोणत्याही आजाराच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केल्यावर पीएफमधून (PF Withdrawal) पैसे काढता येतात.

वैद्यकीय कारणांसाठी प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम काढण्यासाठी अर्ज काढल्यानंतर तीन दिवसांत ती रक्कम बँक खात्यात जमा होते. मात्र, आता हा वेळ कमी करण्यात आला असून तो एक तासावर आणण्यात आला आहे. यापुढे वैद्यकीय कारणासाठी रक्कम काढली, तर ती एका तासात तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

यापूर्वी वैद्यकीय कारणांसाठी पैसे काढताना वैद्यकीय बिले जोडावी लागत असत. मात्र ही अट देखील काढून टाकण्यात आली आहे. वैद्यकीय कारणासाठी पैसे हवे असतील, तर आता कुठलंही बिल किंवा पुरावा देण्याची गरज नाही. केवळ वैद्यकीय कारणासाठी ही रक्कम काढत असल्याचा ऑप्शन निवडून तुम्हाला पैसे मिळवणे शक्य होणार आहे.

अशी असेल प्रक्रिया
अगोदर gov.in या पोर्टलवर लॉग इन करा. होमपेजवर उजव्या बाजूला असणाऱ्या ऑनलाईन ऍडव्हान्स क्लेम या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर epfindia.gov.in/memberinterface वर क्लिक करा. ऑनलाईन सर्व्हिसेसवर जाऊन 31.19.10C आणि 10D हे फॉर्म भरा. आपल्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक भरा आणि कन्फर्म करा.

ड्रॉप डाऊन ऑप्शनमधून PF ADVANCE हा पर्याय निवडा. पैसे काढण्याचं कारण, रक्कम इत्यादी तपशील भरा आणि आपला पत्ता नोंदवा GET ADHAR OTP हा पर्याय निवडून येणारा ओटीपी नोंदवा आणि सबमिट करा. यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल आणि एका तासात पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

















