देशात पेट्रोल भडकलं!; ‘या’ शहरात पेट्रोल 'शंभरी' पार; तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल मिळतं फक्त 'दीड' रुपया लीटर!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 26, 2021 10:58 AM2021-01-26T10:58:13+5:302021-01-26T11:03:40+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35-35 पैशांची वाढ झाली असून ते प्रत्येकी 86.05 रुपये आणि 76.23 रुपयांवर पोहोचले आहे. तर मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी महागले असून 92.62 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच डिझेलच्या दरातही वाढ झाली असून ते 83.03 रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, देशातील एक शहर असेही आहे जेथे पेट्रोलने अक्षरशः शंभरी ओलांडली आहे.

जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनात कपात केल्यामुळे जगभरातील इंधनाचे दर वधारले आहेत.

देशात स्थानिक करप्रणालीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे दिसतात.

श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने ओलांडली शंभरी - राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पेट्रोलचा दर 97.76 रुपये प्रतिलीटर एवढा झाला आहे. तर प्रिमियम पेट्रोलच्या दराने चक्क शंभरी ओलांडली आहे. येथे प्रिमियम पेट्रोलचा दर सध्या 100.51 प्रतीलीटरवर पोहोचला आहे.

राजस्थानातील श्रीगंगानगर सारख्या शहरात पेट्रोलने शंभरी पार केली असली तरी जगात, असे अनेक देश आहेत जेथे पेट्रोलचा दर अत्यंत कमी आहे. यातील एक देश म्हणजे व्हेनेझुएला.

व्हेनेझुएलात पेट्रोलचा दर दीड रुपयांपेक्षाही कमी - व्हेनेझुएला येथे पेट्रोलचा दर दीड रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. येथे पेट्रोल केवळ 1.46 रुपये प्रतीलीटर दराने मिळते. डॉलरच्या भाषेत सांगायचे झाल्यास येथे पेट्रोलचा दर केवळ 0.02 डॉलर एवढाच आहे.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानात पेट्रोल स्वस्त दरात विकले जाते. येथे पेट्रोलचा दर 49.87 रुपये प्रतिलीटर एवढा आहे.

रोज 6 वाजता बदलते किंमत - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज सकाळी 6 वाजता बदल होत असतो. सकाळी 6 वाजताच नवे दर लागू होत असतात.

पेट्रोल-डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी अॅड केल्यानंतर यांच्या किंमती जवळपास डबल होतात.

परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो.