२५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षांत फेडा! जाणून घ्या ही 'मास्टर स्ट्रॅटेजी' आणि वाचवा लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:44 IST2025-08-26T16:22:40+5:302025-08-26T16:44:52+5:30
Home loan EMI reduction strategies : जर तुम्ही २५ वर्षांसाठी गृहकर्ज घेतलं असेल तर योग्य नियोजन करुन तुम्ही ते १० ते १२ वर्षांमध्ये सहज फेडू शकता.

तुमच्या २५ वर्षांच्या गृहकर्जाचा कालावधी फक्त १० वर्षांवर आला तर? हे ऐकायला अशक्य वाटत असले तरी, योग्य नियोजनाने हे नक्कीच शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच एक सोपी आणि प्रभावी रणनीती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लाखो रुपयांची बचत करून लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता.
तुमच्या नियमित मासिक हप्त्या (EMI) व्यतिरिक्त, दर महिन्याला थोडी अतिरिक्त रक्कम भरा. हे लहान पाऊल मोठे परिणाम देते. समजा तुमचा EMI ४०,००० रुपये आहे. जर तुम्ही दर महिन्याला फक्त ५,००० अतिरिक्त भरले, तर एका वर्षात तुम्ही ६०,००० रुपयांचा अतिरिक्त भरणा कराल. ही रक्कम थेट तुमच्या मूळ कर्जाची रक्कम कमी करते, ज्यामुळे व्याजाचा बोजा वेगाने घटतो.
तुमचे उत्पन्न वाढते तेव्हा EMI पण वाढवा. जेव्हा तुमच्या पगारात ५-१०% वाढ होते, तेव्हा तुमचा EMI त्याच प्रमाणात वाढवा. यामुळे तुम्हाला कोणताही अतिरिक्त भार जाणवणार नाही कारण तुमचे उत्पन्न वाढले आहे, पण कर्ज फेडण्याचा वेग खूप वाढेल. यामुळे तुमचे कर्ज १२ वर्षांपूर्वीच पूर्ण होऊ शकते.
जर तुम्ही तुमच्याकडे बोनस, टॅक्स रिफंड किंवा बचतीतून मिळालेली रक्कम असेल, तर ती कर्जामध्ये एकरकमी जमा करा. उदाहरणार्थ, ५० लाख रुपयांच्या कर्जावर ८.५% व्याजदराने २५ वर्षांसाठी घेतलेल्या कर्जावर तुमचा EMI सुमारे ४०,००० रुपये असेल. यावर एकूण व्याज सुमारे ७० लाख रुपये होते. जर तुम्ही दरवर्षी फक्त २ लाख रुपये एकरकमी भरणा केला, तर तुमच्या कर्जाचा कालावधी १०-१२ वर्षांवर येऊ शकतो आणि तुम्ही सुमारे ३५-४० लाख रुपयांचे व्याज वाचवू शकता.
जर तुम्ही तुमच्या गृहकर्जावर जास्त व्याज देत असाल, तर कर्जाची पुनर्रचना करणे हा एक चांगला उपाय आहे. बाजारात कमी व्याजदराच्या अनेक योजना उपलब्ध असतात, ज्यांचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या एकूण व्याजाची रक्कम कमी करू शकता.
यासाठी, आधी तुमच्या बँकेला संपर्क साधा आणि कमी व्याजदराची मागणी करा. जर तुमची बँक सहमत नसेल, तर तुम्ही 'बॅलन्स ट्रान्सफर'द्वारे तुमचे कर्ज कमी व्याज दर देणाऱ्या दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. या रणनीतीमुळे तुमचा EMI कमी होतो आणि कर्ज लवकर फेडण्यास मदत होते.