आयडियाची कल्पना! 13 वर्षीय मुलाने उभारली 100 कोटींची कंपनी; महिन्याला करतो 2 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 05:50 PM2024-01-11T17:50:35+5:302024-01-11T18:24:03+5:30

Success Story : आज हा मुंबईकर मुलगा आपल्या कंपनीमार्फत हजारो लोकांना रोजगारही देतोय.

Success Story : असे म्हणतात की, प्रतिभा वयावर अवलंबून नसते. 13 वर्षीय तिलक मेहताकडे पाहून खरे वाक्य खरे ठरते. तिलक मेहताने अवघ्या तेराव्या वर्षी 100 कोटी रुपयांची कंपनी उभारली. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. आज तिलक दर महिन्याला तब्बल 2 कोटींहून अधिकची कमाई करतो.

तिलकला एक कल्पना सुचली आणि हजारो सर्वसामान्यांची समस्या दूर झाली. विशेष म्हणजे, तिलकने अतिशय कमी खर्चात आपला व्यवसाय सुरू केला. हळूहळू काम वाढत गेले आणि आज तिलकच्या कंपनीने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. एवढंच नाही तर त्याच्या कंपनीने हजारो लोकांचे उत्पन्नही दुप्पट केले आहे.

तिलकची कंपनी काय काम करते?- तिलकने 2018 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी मुंबईत डिलिव्हरी कंपनी सुरू केली. 'पेपर एन पार्सल' असे त्याच्या कंपनीचे नाव आहे. कंपनी सुरू करण्यासाठी त्याच्याकडे फारसे भांडवलही नव्हते. त्याने वडिलांकडून काही पैसे घेतले आणि मुंबईतील जगप्रसिद्ध डब्बेवाल्यांना जोडून कोट्यवधींचा व्यवसाय निर्माण केला.

कल्पना कशी सुचली?- आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेनंतर तिलकला ही कल्पना सुचली. तो एकदा काकांच्या घरी गेला होता, परत येताना त्याचे पुस्तक तिथेच विसरला. दुसऱ्या दिवशी परीक्षा होती, त्यामुळे त्याच दिवशी त्याला पुस्तक हवे होते. त्याच दिवशी कोणतीही डिलिव्हरी कंपनी त्याचे पुस्तक पाठवायला तयार नव्हते. काही डिलिव्हरी कंपन्यांनी मान्य केले, पण भरपूर पैसे मागितले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तिलकने पेपर एन पार्सलचे काम सुरू केले.

स्वस्त ऑनलाइन सेवा सुरू केली- पैशाची कमतरता पाहून त्याला एक नवीन कल्पना सुचली आणि त्याने मुंबईतील डब्बेवाल्यांशी संपर्क साधला. 2018 मध्ये त्यांच्यासोबत ऑनलाइन काम सुरू केले. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना अगदी स्वस्त दरात डिलिव्हरी सेवा मिळू लागली. टिफीन पोहोचवण्याबरोबरच डब्बे विक्रेते विविध पार्सल पोहोचवत असत. त्यामुळे एकाच दिवशी डिलिव्हरी लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि हळूहळू व्यवसायही वेगाने वाढू लागला.

शेकडो नोकऱ्या दिल्या- पेपर्स एन पार्सलने स्थापनेपासून सुमारे 200 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत, तर 5,000 हून अधिक डब्बावाल्यांची कमाई वाढली आहे. कंपनीचा महसूल आता 100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर तिलकची संपत्तीही 65 कोटी रुपये झाली आहे. तिलक आता दररोज सुमारे 7 लाख रुपये, म्हणजेच दरमहा 2 कोटी रुपये कमावतो. आज त्याची कंपनी दररोज सुमारे 1,200 डिलिव्हरी करते.