India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:04 IST2025-05-10T09:56:06+5:302025-05-10T10:04:46+5:30

India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भूराजकीय तणाव पुन्हा एकदा वाढला असतानाच दोन्ही देशांमधील आर्थिक दरी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. काही दशकांपूर्वी पाकिस्तान काही आर्थिक क्षेत्रात भारतापेक्षा पुढे होता, पण आता महत्त्वाच्या आर्थिक निर्देशांकांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे पडलाय.

India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भूराजकीय तणाव पुन्हा एकदा वाढला असतानाच दोन्ही देशांमधील आर्थिक दरी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. काही दशकांपूर्वी पाकिस्तान काही आर्थिक क्षेत्रात भारतापेक्षा पुढे होता, पण आता महत्त्वाच्या आर्थिक निर्देशांकांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे पडलाय. जीडीपी वाढ आणि दरडोई उत्पन्नापासून महागाई नियंत्रण आणि रोजगाराच्या प्रवृत्तीपर्यंत भारतानं सातत्यानं सुधारणांचा स्वीकार केला आहे. मजबूत आर्थिक कामगिरीमुळे भारतानं झपाट्यानं प्रगती केली आहे. तर पाकिस्तान अस्थिरतेशी झगडत आहे.

दरडोई जीडीपीच्या आयएमएफच्या आकडेवारीनुसार (सध्याच्या किमतींनुसार, अमेरिकन डॉलरमध्ये) भारतानं गेल्या काही दशकांमध्ये मजबूत आर्थिक प्रगती दर्शविली आहे. २००० मध्ये पाकिस्तानचा प्रति व्यक्ती जीडीपी ७३३ डॉलर होता, जो भारतापेक्षा खूप जास्त होता. त्यावेळी भारताचा आकडा केवळ ४४२ डॉलर होता. यावरून असं दिसून येते की, त्यावेळी पाकिस्तानचं दरडोई आर्थिक उत्पादन भारतापेक्षा अधिक मजबूत होतं. तथापि, अलीकडच्या वर्षांत यात बदल झाला आहे आणि तेव्हापासून भारताने प्रति व्यक्ती जीडीपीमध्ये खूप वेगानं वाढ दर्शविली आहे.

भारताचा प्रति व्यक्ती जीडीपी २०१४ मध्ये १,५६० डॉलरवरून २०२४ पर्यंत २,७११ डॉलरपर्यंत वाढला, जो गेल्या १० वर्षांत ७४% वाढ दर्शवितो. याउलट पाकिस्तानची कामगिरी तुलनेनं स्थिर राहिली आहे. २०१४ मध्ये १४२४ डॉलरपासून सुरू झालेली वाढ २०२४ मध्ये केवळ १५८१ डॉलरपर्यंत पोहोचली. या कालावधीत पाकिस्तानचा विकासदर ११ टक्क्यांनी वाढला आहे. या काळात दरडोई जागतिक सरासरी जीडीपीमध्येही वाढ झाली.

२०१४ मध्ये ११,१२० डॉलरवरून २०२४ मध्ये १३,९३३ डॉलरपर्यंत वाढली आहे, जी गेल्या दशकाच्या तुलनेत २४% वाढली आहे. ही तुलना अधोरेखित करते की, भारतानं पाकिस्तानला केवळ मागे टाकलं नाही, तर अलीकडच्या वर्षांत दरडोई उत्पन्नवाढीच्या बाबतीत जागतिक सरासरीलाही मागे टाकलं आहे.

गेल्या दशकभरातील वास्तविक जीडीपी वाढीचे आकडे ही पाकिस्तानच्या तुलनेत भारताची मजबूत आर्थिक गती आणि जागतिक सरासरी अधोरेखित करतात. २०१५ ते २०२५ या कालावधीत भारतानं सरासरी वार्षिक जीडीपी वाढीचा दर ६.०८% नोंदवला. महासाथीमुळे २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण (-५.८%) असूनही, भारतानं २०२१ मध्ये ९.७%, २०२२ मध्ये ७.६% आणि २०२३ मध्ये ९.२% विकास दरासह जोरदार पुनरागमन केलं.

याउलट पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेनं याच कालावधीत केवळ ३.४३ टक्के सरासरी वाढीसह अधिक अस्थिर आणि कमकुवत कामगिरी दर्शविली. २०२० मध्ये घसरणीला सामोरं जावं लागलं आणि २०२३ मध्ये नकारात्मक वाढ (-0.2%) नोंदविली गेली, जे वारंवार आर्थिक आव्हानंही दर्शवितं. या काळात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर सरासरी ३.११ टक्के होता. अशा प्रकारे, भारत जागतिक ट्रेंडपेक्षा बराच पुढे होता आणि सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान अधोरेखित केलं.

त्याचप्रमाणे २०१८ ते २०२५ या कालावधीतील बेरोजगारीच्या ट्रेंडमध्येही भारत आणि पाकिस्तानमध्ये विपरीत चित्र दिसून येतं. २०१८ मध्ये तुलनेनं ८.९% असलेला भारतातील बेरोजगारीचा दर २०२५ पर्यंत सातत्यानं घसरून अंदाजे ४.९% पर्यंत घसरला आहे, जे गेल्या काही वर्षांत रोजगाराच्या बाजारपेठेत सुधारणा दर्शवितं. दुसरीकडे, पाकिस्तानचा बेरोजगारीचा दर जो २०१८ मध्ये ५.८% होता, तो घसरला आहे आणि २०२५ पर्यंत तो ८% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर भारतात २०२१ नंतर बेरोजगारीत झपाट्यानं घट झाली आहे. पाकिस्तानमध्ये २०२३ मध्ये बेरोजगारीत लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेत रोजगाराची आव्हानं वाढत आहेत.

ग्राहकांच्या सरासरी किमतींवर आधारित महागाई दराची आकडेवारी गेल्या दशकभरात भारत, पाकिस्तान आणि जगासाठी वेगवेगळे कल दर्शविते. भारतानं तुलनेनं स्थिर महागाईचं वातावरण राखलं. २०१५ मध्ये हा महागाई दर ४.९ टक्के आणि २०२४ मध्ये ४.७ टक्के होता. यामुळे १० वर्षांची सरासरी ४.९७ टक्के झाली, जी जागतिक सरासरी ४.४६ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त आहे. जागतिक स्तरावर महागाई २०१५ मधील २.७% वरून २०२४ मध्ये ५.७% पर्यंत किंचित वाढली आहे. याउलट पाकिस्तानात महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०१५ मध्ये ४.५% होता, तो २०२४ पर्यंत २३.४% पर्यंत वाढला, ज्यामुळे १० वर्षांची सरासरी महागाई १०.८१% झाली, जी जागतिक सरासरी आकडेवारीच्या दुप्पट आहे.