पॅन कार्ड बनवणे आता होणार कठीण! १ एप्रिल २०२६ पासून नियम बदलणार; केवळ 'आधार' आता पुरेसे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 16:49 IST2026-03-22T16:25:50+5:302026-03-22T16:49:52+5:30

Pan Card New Rules 2026 : जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. १ एप्रिल २०२६ पासून पॅन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत केंद्र सरकार मोठे बदल लागू करणार आहे. आतापर्यंत केवळ आधार कार्डच्या जोरावर पॅन कार्ड मिळवणे सोपे होते, मात्र नव्या आर्थिक वर्षापासून ही प्रक्रिया अधिक कडक आणि विस्तृत केली जाणार आहे.

पॅन कार्ड संदर्भातील हे सर्व नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून देशभरात लागू होतील. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत जुन्या सोप्या पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

सध्या आधार कार्डच्या आधारे झटपट पॅन कार्ड मिळते. मात्र, नव्या नियमांनुसार केवळ आधार कार्ड आता पुरेसे असणार नाही. अर्जदारांना अतिरिक्त कागदपत्रे जोडावी लागतील.

आता आधारसोबतच ओळख पटवण्यासाठी आणि जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी इतर सरकारी कागदपत्रे देणे अनिवार्य असेल.

नव्या प्रक्रियेत जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा १० वीचे बोर्ड सर्टिफिकेट यांपैकी कागदपत्रे सादर करावी लागतील.

पॅन कार्डवरील माहिती आणि आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख व इतर तपशील तंतोतंत जुळणे आता बंधनकारक असेल. माहितीमध्ये थोडीही तफावत असल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

सरकारने पॅन कार्डसाठी नवीन अर्ज फॉर्म तयार केले आहेत. १ एप्रिलनंतर जुने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. सर्व कामे केवळ नवीन फॉरमॅटमध्येच करावी लागतील.

केवळ एकाच पुराव्यावर विसंबून न राहता, अनेक कागदपत्रांची पडताळणी केल्यामुळे पॅन कार्डची सुरक्षा वाढणार आहे आणि बनावट पॅन कार्ड बनवण्याला लगाम बसेल.

पडताळणीसाठी जास्त कागदपत्रे लागणार असल्यामुळे पॅन कार्ड मिळण्यासाठी लागणारा वेळ आता पूर्वीच्या तुलनेत वाढू शकतो.