New Labour Code: १ एप्रिलपासून बदलणार कामाचे नियम; कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी ते ओव्हरटाईमवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 08:56 IST2026-03-31T08:37:26+5:302026-03-31T08:56:54+5:30

New Labour Code: १ एप्रिल २०२६ पासून देशात नवीन कामगार कायदे लागू होणार आहेत, जे कर्मचाऱ्यांचा पगार, ओव्हरटाइम, कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित नियमांना पूर्णपणे बदलून टाकतील.

चार नवीन लेबर कोड - वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता - हे ४४ कामगार कायद्यांना एका सोप्या आराखड्यात गुंफण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण २९ तरतुदी असतील, ज्यामुळे पूर्वीची क्लिष्ट कायदेशीर व्यवस्था सोपी आणि पारदर्शक होईल.

सरकारने या कोडना २१ नोव्हेंबर २०२५ पासून अधिसूचित केले होते आणि ड्राफ्ट नियम सार्वजनिक सल्ल्यासाठी ठेवले होते. जानेवारीपर्यंत आलेल्या सूचनांनंतर मंत्रालयाने केंद्रीय स्तरावर यांच्या अंमलबजावणीच्या नियमांना अंतिम रूप दिलंय.

नवीन लेबर कोडअंतर्गत, कामाचे मानक तास पूर्वीप्रमाणेच दररोज ८ तास आणि साप्ताहिक ४८ तास राहतील. तथापि, यामध्ये काम करण्याच्या पद्धतींना अधिक लवचिक बनवण्यात आले आहे. नियोक्ता आता कर्मचाऱ्यांना फ्लेक्सिबल वर्किंग कल्चर देऊ शकतील. साप्ताहिक कामाच्या तासांच्या व्यवस्थापनाच्या आधारावर अतिरिक्त ओव्हरटाइमचे पर्याय देखील उपलब्ध असतील.

ओव्हरटाइमची ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय कामगार पद्धतींच्या सुसंगत ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही लवचिकता मिळेल, परंतु कामगारांच्या हिताचं रक्षण देखील सुनिश्चित राहील. नवीन लेबर कोडचा एक प्रमुख उद्देश सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणं हा आहे. सरकार मार्च २०२६ पर्यंत सामाजिक सुरक्षा लाभ १०० कोटी कामगारांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे, तर सध्या हा आकडा सुमारे ९४ कोटी आहे.

हे एक मोठं यश आहे, कारण २०१५ मध्ये सामाजिक सुरक्षेची व्याप्ती केवळ १९ टक्के होती, जी २०२५ पर्यंत वाढून ६४ टक्क्यांहून अधिक झाली आहे. आता असंघटित क्षेत्रातील कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर, तसेच स्वयंरोजगार करणारे लोकही यामध्ये समाविष्ट होतील.

नवीन लेबर कोडमध्ये पारदर्शकता आणि कामगार संरक्षणाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना अपॉईंटमेंट लेटर देणं अनिवार्य असेल, ज्यामुळे रोजगाराला औपचारिक मान्यता मिळेल. नवीन लेबर कोडमध्ये समान कामासाठी समान वेतन आणि महिलांसाठी समान संधींची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आता योग्य सुरक्षा व्यवस्थेसह वेगवेगळ्या शिफ्टमध्येही काम करू शकतील. याशिवाय, ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कामगारांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे.

नवीन व्यवस्थेत ओव्हरटाइमला नियमित (Regularize) करण्यात आले आहे, जे आंतरराष्ट्रीय कामगार मानकांनुसार कामगारांसाठी एक पर्याय म्हणून सादर केलं जाईल. यामुळे उद्योगांना कामातील चढ-उतार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत होईल, तसंच अतिरिक्त तासांच्या कामासाठी कामगारांना योग्य मोबदला मिळेल याचीही खात्री केली जाईल. हे पाऊल नोकरी देणारे आणि घेणारे या दोघांसाठी एक संतुलित दृष्टिकोन मांडतं.