SIP चा १२:१२:२० फॉर्म्युला; एकदा समजून घेतला की, कधीही कमी पडणार नाहीत पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:09 IST2025-05-28T12:49:51+5:302025-05-28T13:09:15+5:30
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत कारण त्यातून मोठ्या प्रमाणात चांगला परतावा मिळत आहे. यातून मिळणारा नफा शेअर बाजारातील चढउतारांवर अवलंबून असतो.

प्रत्येकजण त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांपैकी काही रक्कम वाचवतो आणि ती सर्वोत्तम परतावा देणाऱ्या पर्यायात गुंतवण्याचा विचार करत असतो. लहान-लहान बचतीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी एसआयपीतून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा पर्याय अनेक जण निवडतात.
म्युच्युअल फंड एसआयपी हा या बाबतीत एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे, जो गुंतवणूकदारांना दीर्घकाळात चांगला नफा देतो. एसआयपीतून योग्य नियोजन आणि योग्य गुंतवणूक करून, कोणीही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
पण अनेकांना यात कशी गुंतवणूक करावी याची माहिती नसते. नेमके किती पैसे किती काळासाठी गुंतवावेत, हे त्यांना ठाऊक नसते. याचा अनुभव नसल्याने लोक या मार्गाला जाणे टाळतात. परंतु, यातील गुंतवणुकीसाठी १२:१२:२० हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी काम सोपे होऊ शकते.
यातील १२ म्हणजे तुम्हाला मिळत असलेल्या एकूण रकमेपैकी १२ टक्के रक्कम निवडलेल्या पर्यायात गुंतवावी. पुढचे १२ म्हणजे केलेल्या गुंतवणुकीवर किमान १२ टक्के इतका परतावा मिळायला हवा हे गणित लक्षात ठेवावे आणि २० चा अर्थ ही गुंतवणूक किमान २० वर्षांसाठी करा. हे गणित लक्षात ठेवल्यास तुमचे नियोजन नीटपणे होईल तसेच तुमच्या इतर दैनंदिन व्यवहारांवर कोणताही ताण येणार नाही.
उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दर महिन्याला ३५ हजार रुपये कमावत आहे. तर त्याने यातील १२ टक्के म्हणजे ४,२०० रुपये एसआयपीमध्ये गुंतवावेत. त्या व्यक्तीला १२ टक्के परतावा गृहीत धरल्यास २० वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर ३८,६३,४१० रुपये मिळतील. लक्षात ठेवावे की या मार्गाने मिळणाऱ्या नफ्यावर काही कर द्यावा लागत असतो.
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की त्यात शेअर बाजाराचा धोका खूप असतो. यासोबतच, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की एसआयपीमधून मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला भांडवली नफा कर भरावा लागेल.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या अहवालानुसार, जून २०२४ मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्ये २१,२६२ कोटी गुंतवले होते, जे मे २०२४ मध्ये ₹२०,९०४ कोटींपेक्षा जास्त होते. याशिवाय, एसआयपी खात्यांची संख्या ८.९८ कोटी झाली आहे, ज्यामुळे या गुंतवणूक पर्यायाची वाढती लोकप्रियता दिसत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)