मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 07:32 PM2021-08-26T19:32:52+5:302021-08-26T19:37:30+5:30

BPCL च्या खासगीकरणातून ८० हजार कोटी रुपयांची कमाई होईल, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीकरणाच्या योजना सादर केली. त्यातून सरकार १.७५ लाख कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले. तसेच खासगीकरणालाही मोदी सरकारकडून प्रोत्साहन असल्याचे पाहायला मिळत आहे. एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांचे (BPCL) खासगीकरण करण्याबाबतही केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

याचाच एक भाग म्हणून भारत पेट्रोलियम कंपनीच्या खासगीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक पुढचा टप्पा गाठला आहे, असे सांगितले जात आहे. BPCL खासगीकरणासाठी जागतिक स्तरावरील काही कंपन्यांनी रस दाखवला आहे.

BPCL कंपनीच्या खासगीकरणासाठी भारतातील एक आणि अमेरिकेतील दोन कंपन्या इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. एका कागदपत्रातून ही बाब समोर आली आहे. बीपीसीएल निर्गुंतवणुकीवरील संक्षिप्त टीप अशा नावाचा एक दस्ताऐवज समोर आला आहे.

BPCL साठी अब्जाधीश व्यापारी अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुप आणि अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेअर कॅपिटल या दोन अमेरिकन फंडांनी गेल्या वर्षी भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इंधन किरकोळ विक्रेत्यासाठी सरकारचा संपूर्ण ५२.९८ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रारंभिक बोली लावली होती.

व्यवहाराच्या पुढील टप्प्याचा भाग म्हणून व्यवहार सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापनकर्ता आस्थापना अहवाल सादर करणार आहे. तसेच बोलीदार कंपनीच्या आवश्यकता पूर्ण करेल आणि विक्री-खरेदी कराराला अंतिम रूप देतील.

पुढे कन्सोर्टियम तयार होत असल्याने बोलीदारांकडून सुरक्षा मंजुरी आवश्यक असू शकते, असे अधिक तपशील न देता अहवालात म्हटले आहे. इतर इच्छुकांना बोली प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी आहे आणि ज्या बोलीदारांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट केले आहे, त्यांच्यापैकी एकाला संघ तयार करण्याची परवानगी आहे.

भारतीय अब्जाधीश व्यापारी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी तसेच रॉयल डच शेल, बीपी आणि एक्सॉन यांसारख्या जागतिक तेल कंपन्यांनी अंतिम मुदतीपर्यंत BPCL च्या अधिग्रहणासाठी ईओआय सादर केले नाहीत.

मध्यपूर्वेतील अनेक प्रमुख तेल उत्पादक आणि रशियाचे रोझनेफ्ट यांना BPCL मध्ये स्वारस्य असल्याचे सांगण्यात येते, परंतु त्यांनी कोणतीही बोली सादर केली नाही.

उद्योगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य पूर्वमधील एक प्रमुख जागतिक तेल क्षेत्र किंवा तेल उत्पादक आधीच शर्यतीत असलेल्या गुंतवणूक निधीशी जवळून काम करत असेल. अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अदानी समूह या शर्यतीत सामील होण्याची शक्यता नाही.

BPCL च्या खासगीकरणातून ८० हजार कोटी रुपयांची कमाई होईल, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंतचे देशातील सर्वांत मोठे खासगीकरण मानले जाते.