'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:29 IST2025-09-10T10:24:37+5:302025-09-10T10:29:19+5:30

MINI Cooper : जीएसटी दरांमध्ये कपात झाल्यानंतर वाहन क्षेत्रात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केलं आहे. यात आता देशातील सर्वात सुंदर छोट्या कारचाही समावेश झाला आहे.

मिनी इंडियाने आपल्या गाड्यांच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे मिनी कूपर एस आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. सध्या किमतींमधील हा बदल फक्त कूपर एस हॅचबॅक मॉडेलसाठी लागू झाला आहे, तर कंट्रीमन ई इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

नवीन किमतींनुसार, बेस-स्पेक एसेंशियल ट्रिम: पूर्वीची किंमत ४६.२० लाख रुपये होती, आता ती ४३.७० लाख रुपयांत उपलब्ध होईल. यामुळे २.५ लाख रुपयांची बचत झाली आहे.

क्लासिक ट्रिम: यावर २.७५ लाख रुपयांची कपात झाली असून, आता ही गाडी ५१.९५ लाख रुपयांऐवजी ४९.२० लाख रुपयांना मिळेल.

फेव्हर्ड आणि जॉन कूपर वर्क्स ट्रिम: या दोन्ही मॉडेल्सच्या किमतीत प्रत्येकी ३ लाख रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. फेव्हर्ड ट्रिमची नवी किंमत ५२ लाख रुपये आहे, तर जॉन कूपर वर्क्स आता ५४.५० लाख रुपयांना मिळेल.

कंपनीने जीएसटी कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मिनी गाड्या अधिक परवडणाऱ्या होतील.

या रणनीतीमुळे भारतीय बाजारात मिनीची स्पर्धा आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. येत्या काळात कंपनीच्या आणखी मॉडेल्सच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.