Crude Oil Price: डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि कच्च्या तेलाची किंमत घसरली; म्हणाले, "युद्ध लवकरच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:31 IST2026-03-10T09:19:24+5:302026-03-10T09:31:07+5:30

Crude Oil Price Donald Trump: कच्च्या तेलाच्या किमतींबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली.

Crude Oil Price Donald Trump: कच्च्या तेलाच्या किमतींबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली. आदल्या दिवशी तेलाच्या किमती तीन वर्षांहून अधिक काळातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या.

परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर बाजारात सुधारणा झाली. क्षेत्रातील सुरू असलेलं युद्ध लवकरच संपू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिल्याने जागतिक तेल पुरवठ्यातील व्यत्ययाची भीती कमी झाली आहे. मंगळवारी 'ब्रेंट क्रूड'चा वायदा भाव ६.५१ डॉलर (सुमारे ६.६%) घसरून ९२.४५ डॉलर प्रति बॅरलवर आला. तसंच, अमेरिकन 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' (WTI) क्रूड ६.१२ डॉलर (सुमारे ६.५%) नं कमी होऊन ८८.६५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं.

सोमवारी तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती आणि दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले होते. यादरम्यान ब्रेंट ११९.५० डॉलर आणि WTI ११९.४८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते, जी २०२२ च्या मध्यानंतरची सर्वोच्च पातळी आहे.

सौदी अरेबियासह प्रमुख देशांनी उत्पादनात केलेली कपात आणि अमेरिका-इस्रायल-इराणमधील वाढत्या तणावामुळे किमती वाढल्या होत्या. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर किमतीत घसरण झाली. इराण युद्ध लवकर संपवण्यासाठी काही प्रस्तावांवर या चर्चेत विचार करण्यात आला असून, त्यामुळे संघर्ष लवकर संपण्याची आशा निर्माण झाली आहे.

इराणविरुद्धचे युद्ध आता संपण्याच्या स्थितीत आहे आणि अमेरिका आपल्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खूप पुढे गेली आहे, असं ट्रम्प म्हणाले. दुसरीकडे, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोर'नं (IRGC) इशारा दिला आहे की, युद्ध कधी संपवायचे याचा निर्णय ते स्वतः घेतील. तसेच अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू राहिल्यास क्षेत्रातील तेल निर्यात पूर्णपणे थांबवली जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली. याव्यतिरिक्त, रशियावरील तेल निर्बंध शिथिल करणं आणि किमती नियंत्रित करण्यासाठी आपत्कालीन तेल साठा खुला करणे यांसारख्या पर्यायांवर ट्रम्प विचार करत असल्याच्या बातम्यांमुळे बाजारावर दबाव आहे.

मार्केट ॲनॅलिस्ट टोनी सिकामोर यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत पुढेही मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. येत्या काळात तेल ७५ ते १०५ डॉलर प्रति बॅरलच्या मर्यादेत राहू शकते.

दरम्यान, तणावामुळे खाडी क्षेत्रातील अनेक देशांनी उत्पादनात कपात सुरू केली आहे. इराकनं आपल्या दक्षिण तेल क्षेत्रातील उत्पादन ७० टक्क्यांनी कमी करुन १.३ दशलक्ष बॅरल प्रति दिवस केलं आहे, तर कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशननं उत्पादन कमी करण्यासोबतच 'फोर्स मेज्योर' घोषित केलं आहे.