LIC Shareholders: एलआयसी शेअरधारकांसाठी आज महत्वाचा दिवस; IPO चे नुकसान भरून निघणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 09:24 AM2022-05-30T09:24:57+5:302022-05-30T09:30:15+5:30

LIC Shareholders can recover loss by IPO: एलआयसी बोर्डाची आज बैठक होत आहे. पुढील काळात एलआयसीचा एफपीओ आणण्याची सरकारची योजना आहे.

सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरधारकांसाठी (LIC Shareholders) आजचा खूप महत्वाचा दिवस आहे. पॉलिसीधारकांचे आयपीओतून मोठे नुकसान झाले होते, ते आज भरून निघण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच एलआयसी मार्च तिमाहीचा निकाल जारी करणार आहे.

एलआयसी बोर्डाची आज बैठक होत आहे. यामध्ये तिमाहीच्या निकालासोबत शेअरहोल्डर्सला डिविंडंड देण्याचा विचार केला जाणार आहे. अर्थतज्ज्ञांनुसार एलआयसी गुंतवणूकदारांना चांगला डिविडंड देण्याची घोषणा करेल.

कंपनीच्या आयपीओनंतर समभागांची लिस्टिंग डिस्काऊंटवर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर एलआयसीसाठी शेअर बाजाराचा प्रवास आतापर्यंत चांगला राहिलेला नाही. शेअर बाजार उसळला तरी देखील एलआयसीचे शेअर पडत होते. LIC IPO साठी 902-949 रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. जवळपास 9 टक्के सूट देऊन कंपनीचा शेअर बाजारात लिस्ट झाला.

LIC च्या IPO चा आकार रु. 20,557 कोटी होता आणि तो 2.95 पट सबस्क्राइब झाला होता. लिस्टिंग झाल्यापासून, त्याची किंमत सतत घसरत आहे. शुक्रवारी एलआयसीचा शेअर बीएसईवर 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 821.55 रुपयांवर बंद झाला. याच्या एक दिवस आधी, कंपनीचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये 801.55 रुपयांपर्यंत घसरला होता, जो LIC शेअरचा नवा नीचांक आहे.

LIC चा स्टॉक सध्या 13.42 टक्क्यांनी तोट्यात आहे. सध्या, कंपनीचा MCap रुपये 5,19,630.19 कोटी आहे, जो इश्यू किमतीनुसार 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. यामुळे शेअर बाजारातून सध्यातरी पॉलिसीधारक पैसे कमवू शकत नाहीएत.

३० मे रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील असे एलआयसीने गेल्या आठवड्यात शेअर बाजाराला सांगितले होते. ३० मे रोजी बोर्डाची बैठक होत आहे, तेव्हा मार्च तिमाहीचे निकाल विचारात घेतले जातील. याशिवाय गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या लाभांशावरही बैठकीत चर्चा होणार आहे, असे यात म्हटले होते.

कंपनीने गेल्या वर्षी कोणताही लाभांश दिला नाही. पुढील काळात एलआयसीचा एफपीओ आणण्याची सरकारची योजना आहे. गुंतवणूकदारांनी एफपीओवर तुटून पडावे यासाठी आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना नफा मिळायला हवा. यामुळे, आज LIC च्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा मिळू शकेल, असे तज्ज्ञांना वाटत आहे.