Byju's Raveendran: झटपट श्रीमंत! BYJU च्या मालकाने जगप्रसिद्ध आनंद महिंद्रा, राकेश झुनझुनवालांनाही मागे टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:31 PM2021-09-30T17:31:00+5:302021-09-30T17:39:26+5:30

Byju's Raveendran richer than Rakesh Jhunjhunwala, Anand Mahindra: शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेस घेणारी कंपनी Byjus ने कोरोना काळात मोठी झेप घेतली आहे. शाळा बंद असल्याचा फायदा कंपनीला झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या टीशर्टवर जे नाव दिसते BYJU ते साधेसुधे नाव नाहीय. या कंपनीच्या मालकाने दस्तुरखुद्द उद्योगपती आनंद महिंद्रा आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांनाही मागे टाकले आहे. BYJU ने आजपर्यंत आठ कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. यासाठी यंदा २.२ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.

शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेस घेणारी कंपनी Byjus ने कोरोना काळात मोठी झेप घेतली आहे. शाळा बंद असल्याचा फायदा कंपनीला झाला आहे. याचा फायदा उठवत कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच काबीज केल्या आहेत. अशा प्रकारे रवींद्रन यांच्या मालकीची ही कंपनी देशातील सर्वात श्रीमंत स्टार्ट अप बनली आहे. याचबरोबर रवींद्रन यांनी देशातील दिग्गज उद्योगपती व गुंतवणूकदारांनाही मागे टाकले आहे.

देशातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या कंपन्या विकत घेणे आणि कोरोना संकटात व्यवसाय वृद्धीच्या कारणामुळे बायजू रवींद्रन यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बायजू यांच्या कुटुंबाची संपत्ती ही 24300 कोटी रुपये झाली आहे. हुरून इंडिया रिच लिस्टच्या आकड्यांवरून ही माहिती मिळाली आहे.

यानुसार बायजू हे देशातील ६७ वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या १ वर्षात बायजू यांची संपत्ती २० टक्क्यांनी वाढली आहे. 2017 पासून रवींद्रन हे श्रीमंतांच्या यादीत 504 नंबरनी वर आले आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये तेच एकमेव असे उद्योजक आहेत ज्यांनी एवढ्या प्रचंड वेगाने झेप घेतली आहे.

रवींद्रन यांच्या तुलनेत जोहोचे राधा वैंबू यांची संपत्ती 23,100 कोटी, राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 22,300 कोटी, आनंद महिंद्रांची संपत्ती ₹22,000 कोटी तर नंदन निलेकणींची संपत्ती 20900 कोटी रुपये आहे.

ऑनलाइन कोचिंगची सुविधा देणाऱ्या बायजूचे बाजारमुल्य 16.5 अब्ज डॉलर झाले आहे. कंपनी भविष्यात २१ अब्ज डॉलरच्या बाजारमुल्याबरोबर दीड अब्ज डॉलरची रक्कम जमविण्यासाठी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे बायजूला आयपीओ आणण्यासाठी बँकर सांगत आहेत.

जर बायजू शेअर बाजारात लिस्ट झाली तर तिचे बाजारमुल्य जवळपास अडीज पटीने वाढून $50 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. असे झाले तर रवींद्रन यांच्या संपत्तीतही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.