खात्यात चुकीने आले लाखो रुपये? ही चूक करू नका, अन्यथा जावे लागेल तुरुंगात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 09:19 AM2022-11-11T09:19:25+5:302022-11-11T09:26:58+5:30

अनेकदा चुकीने एखाद्याच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा होतात. चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात किंवा तुमच्या खात्यातच असे पैसे जमा झाले तर? अशा वेळी पैसे पाठविणाऱ्याचे टेन्शन वाढते. समोरच्याने ते पैसे खर्च करून टाकले किंवा पैसे परत देण्यास नकार दिला तर? एका जोडप्यासोबत असा प्रकार घडला. तुमच्याही खात्यात चुकीने असे पैसे आले, तर ही काळजी घ्या. अन्यथा तुरुंगाची हवा खावी लागेल.

एका जोडप्याने घर खरेदीचे पैसे चुकीने दुसऱ्याच्याच खात्यात जमा केले. ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले, तो ऑस्ट्रेलियात राहणारा एक तरुण होता. त्याने ते पैसे उडविले. हा प्रकार उघडकीस येताच त्याला अटक करण्यात आली. त्याला बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविले असून डिसेंबरमध्ये शिक्षा सुनावली जाणार आहे. हा ऑस्ट्रेलियातील प्रकार. भारतात याबाबत कायदा काय सांगतो?

तुमच्या खात्यात चुकीने पैसे जमा झाल्यास दोन ठिकाणी माहिती द्यायला हवी. सर्वप्रथम बँकेला याबाबत सविस्तर माहिती द्या. त्यानंतर पोलिसांना कळवा. तुमच्या खात्यात आलेले पैसे कदाचित बेकायदा फंडचे किंवा देशविरोधी कारवायांसंबंधी पाठविलेले पैसे असू शकतात.

सर्वप्रथम खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड, दोन्ही २-३ वेळा पडताळून घ्या. मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यापूर्वी १० रुपयांसारखी कमी रक्कम पाठवा. ते जमा झाल्याची खातरजमा केल्यानंतरच पुढचा व्यवहार करा.

खात्यात आलेले पैसे खर्च केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ज्याने पैसे पाठविले, ती व्यक्ती रिकव्हरीचा खटला दाखल करू शकते. १ ते ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद कायद्यात आहे.

चुकीने एखाद्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले व त्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिल्यास तुम्हाला रिकव्हरी खटला दाखल करावा लागेल. तातडीने स्वत:च्या बँकेला कळवा, बँकेची मदत घ्या. ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्या बँकेत संपर्क करा.

तेथून संबंधित व्यक्तीला बँक संपर्क करून पैसे परत करण्याची विनंती करू शकते. त्याने मान्य केल्यास आठवडाभरात तुम्हाला पैसे परत मिळू शकतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत, तीच बँक यात मदत करू शकते.