Parle G: स्वदेशी आंदोलनातून मिळाली प्रेरणा; जगात गाजणाऱ्या बिस्किट कंपनीचा ‘असा’ आहे इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:48 PM2020-06-10T12:48:40+5:302020-06-10T12:52:57+5:30

मागील वर्षी तोट्यात चालणारी पारले बिस्किट कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लॉकडाऊन दरम्यान पारले बिस्किटची एप्रिल आणि मे महिन्यात विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे. तब्बल ८२ वर्षाच्या इतिहासात पारले बिस्किटची इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. नेमका लोकांच्या पसंतीच्या या बिस्किट ब्रँडची कहाणी काय हे जाणून घेऊया.

पारले बिस्किट कंपनीची सुरुवात १९२९ मध्ये झाली होती. ज्यावेळी देशात ब्रिटीश राजवटीविरोधात स्वदेशी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरु होतं. स्वदेशी आंदोलन आणि महात्मा गांधी स्वतंत्रता चळवळीचे केंद्र बिंदू होते.

महात्मा गांधींनी स्वराज्य हा आत्मा आहे. ब्रिटिश राजवटीतील मालाचा बहिष्कार करुन स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी भर दिला. या आंदोलनाच्या विचारातून १९२९ मध्ये मोहनलाल दयाल यांनी मुंबईच्या विलेपार्ले येथे १२ लोकांच्या मदतीने ही कंपनी सुरु केली.

विलेपार्ले येथे सुरु झालेल्या या कंपनीला पारले कंपनी असं नाव देण्यात आलं. पारले कंपनीनं पहिल्यांदा १९३८ साली पारले ग्लूकोज नावानं बिस्किटाचं उत्पादन सुरु केलं होतं.

१९४०-५० च्या दशकात कंपनीने भारतात पहिल्यांदा नमकीन बिस्किट मॉनेको समोर आणलं. पारलेने १९५६ मध्ये एक खास स्नॅक्स बनवला, जो पनीरसारखा होता.

त्यानंतर पारले कंपनीनं चॉकलेटमध्ये १९६३ मध्ये पहिल्यांदा किस्मी आणि १९६६ मध्ये पॉपीसचं उत्पादन सुरु केले. याच काळात कंपनीने नमकीन स्नॅक्स म्हणून पारले जेफ लॉन्च केले.

१९७४ मध्ये पारले स्वीट नमकिन क्रॅकजैक बिस्किट पुढे आणलं. १९८० मध्ये पारले ग्लूकोज बिस्किटाचं नाव शॉर्ट करुन Parle G असं करण्यात आलं. जी म्हणजे ग्लूकोज असं होतं. १९८३ मध्ये चॉकलेट मेलोडी आणि १९८६ मध्ये भारतातील पहिलं मँगो कँडी बाइट लॉन्च केले.

१९९६ मध्ये Hide & Seek बिस्किट पारले कंपनीने लॉन्च केले. आज हे बिस्किट चॉकलेट चिप म्हणून चर्चेत आहे. आजच्या घडीला जगभरात पारले पोहचलं आहे. पारले कंपनीचे देशाबाहेर ७ उत्पादन युनिट्स आहेत. यात कॅमरुन, नायजेरिया, घाना, इथियोपिया, केनिया, आयवरी कोस्ट, नेपाळ येथे उत्पादन फॅक्टरी आहेत.

२०१८ मध्ये पारले कंपनीने मॅक्सिको येथे नवीन प्लॅंट बनवला. २०११ मध्ये पारले जी जगातील सर्वाधिक विक्री होणारा बिस्किट बँड बनला. पारले कंपनीची ओळख विविध जाहिरातींमधून लोकांना झाली.

९० च्या दशकात मुलांचा आवडता कार्यक्रम शक्तिमान, छोट्या मुलीचा फोटो, वेगवेगळ्या प्रकारे पारले बिस्किट लोकांच्या पसंतीस पडले. आज पारले बिस्किटच्या २ रुपयापासून ५० रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे उत्पादन आहेत. ग्रामीण भागात आजही पारले बिस्किट सर्वात जास्त विकले जाते.

अशातच लॉकडाऊन काळात अनेकांची काम ठप्प झाल्याने मजुरांनी आपल्या घराकडे पायपीट सुरु केली, या मजुरांसाठी पारले बिस्किट एकप्रकारे त्यांच्यासाठी जगण्याचं साधन बनलं.